Join us

व्यवस्थापन प्रवेशांची होणार तपासणी, गेल्या वर्षीच्या प्रवेशांबाबत संशय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2019 06:10 IST

राज्यातील व्यवस्थापन पदव्युत्तर (एमबीए) अभ्यासक्रमाच्या प्रवेशादरम्यान खोट्या गुणपत्रिका व माहिती सादर केल्याची १८७ प्रकरणे उघडकीस आली.

मुंबई : राज्यातील व्यवस्थापन पदव्युत्तर (एमबीए) अभ्यासक्रमाच्या प्रवेशादरम्यान खोट्या गुणपत्रिका व माहिती सादर केल्याची १८७ प्रकरणे उघडकीस आली. या पार्श्वभूमीवर सीईटी सेल, तंत्रशिक्षण विभागात गेल्या वर्षी निश्चित केलेल्या प्रवेशांबाबतही संशय निर्माण झाला आहे. त्यामुळे गेल्या वर्षी एटमा (एम्स टेस्ट फॉर मॅनेजमेंट अ‍ॅडमिशन) या प्रवेश यंत्रणेकडून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकांची तपासणी सीईटी सेल आणि तंत्रशिक्षण विभागाकडून करण्यात येईल.राज्यातील व्यवस्थापन अभ्यासक्रमाचे प्रवेश हे राज्य पातळीवर प्रवेश परीक्षेच्या माध्यमातून होतात. त्यातील अखिल भारतीय कोट्यातील प्रवेश हे राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांच्या माध्यमातून होतात. कॅट, सीमॅट शिवाय काही व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या खासगी संस्थाही परीक्षा घेत असतात. त्यामुळे त्यांची गुणवत्ता, दर्जा आणि विश्वासार्हतेवर कोणाचेही नियंत्रण नसते. यंदा काही विद्यार्थ्यांचे पर्सेन्टाइल वाढल्याच्या तक्रारी आल्याने त्याची तपासणी केली. तेव्हा तब्बल १८७ विद्यार्थ्यांनी बनावट कागदपत्रे सादर केल्याचे उघडकीस आले. त्यापैकी २५ विद्यार्थ्यांना प्रवेशही देण्यात आले होते. खोटी माहिती सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये १५० विद्यार्थ्यांनी चुकीची गुणपत्रिका तर ३७ विद्यार्थ्यांनी चुकीचे नाव व चुकीची माहिती सादर केल्याचे पडताळणीत समोर आले. त्यामुळे सीईटी प्रवेश समितीकडून हे प्रवेश रद्द करण्यात आले. यामुळे गेल्या वर्षीही असाच प्रयत्न विद्यार्थ्यांनी केला होता का, असा संशय निर्माण झाला आहे. त्यासाठी गेल्या वर्षी एमबीएला प्रवेश घेतलेल्या १,२२८ विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.दरम्यान, बनावट कागदपत्रे सादर करून विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले, असे आताच म्हणता येणार नाही. मात्र या वर्षी बनावट कागदपत्रांच्या आधारे प्रवेश घेतल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्यानंतर प्रकार समोर आला. त्यामुळे गेल्या वर्षी अशा प्रकारे प्रवेश झाले आहेत का? याची तपासणी केली जाईल. त्यांचे प्रवेश रद्द करण्यासंदर्भात निर्णय प्राधिकरणासमोर ठेवला जाईल, अशी माहिती सीईटी सेलचे आयुक्त आनंद रायते यांनी दिली.

टॅग्स :शिक्षण क्षेत्र