Join us

पोषण आहारात उंदीर; चौकशीसाठी आता समिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 09:37 IST

पोषण आहाराच्या पाकिटात मृत उंदीर आढळल्याच्या घटनेची चौकशी करण्यात येणार

मुंबई : रायगड जिल्ह्यातील वडखळ ग्रामपंचायत येथील अंगणवाडीत बालकांसाठी देण्यात येणाऱ्या पोषण आहाराच्या पाकिटात मृत उंदीर आढळल्याच्या घटनेची चौकशी करण्यात येईल. त्यासाठी स्वतंत्र समिती नेमण्यात येईल, असे महिला आणि बालविकासमंत्री आदिती तटकरे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.

याबाबतचा प्रश्न विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला होता. यावेळी प्रशांत ठाकूर, विश्वजित कदम, सरोज आहिरे यांनी उपप्रश्न उपस्थित केले. मंत्री तटकरे म्हणाल्या, वडखळ ग्रामपंचायतीच्या सर्व अंगणवाड्यांमध्ये वाटप झालेल्या घरपोच आहाराची पुनर्वितरण प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

पुरवठाधारकाकडून खुलासा मागवण्यात आला होता आणि त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. पाकिटात आढळलेले प्राणीसदृश्य अवशेष ओल्या अवस्थेत असल्याने ते अलीकडेच मृत झाले असावेत. तसेच, पूर्णतः स्वयंचलित उत्पादन प्रक्रियेमुळे असे होणे शक्य नाही, असे पुरवठाधारकाने म्हटले आहे.

नमुने का तपासले नाही याची होणार चौकशी

पोषण आहाराच्या पाकिटात मृत उंदराचे अवशेष सापडले, पण प्रयोगशाळांनी हे नमुने तपासले नाही, या प्रकरणीदेखील समिती चौकशी करणार आहे. या प्रकरणात जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. असेही मंत्री तटकरे यांनी सांगितले. 

टॅग्स :महाराष्ट्र बजेट 2025अदिती तटकरे