Join us
Daily Top 2Weekly Top 5

सहा लाख गुंतवा आणि पाच कोटी मिळवा; प्रॉपर्टी ब्रोकरला चौघांनी गंडविले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2024 10:03 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : नासा (नॅशनल एरोनॉटिक्स ॲण्ड स्पेस प्रशासन)मध्ये मागणी असलेले ५०० कोटींचे तांबे अर्थात राइस पुलिंग ...

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : नासा (नॅशनल एरोनॉटिक्स ॲण्ड स्पेस प्रशासन)मध्ये मागणी असलेले ५०० कोटींचे तांबे अर्थात राइस पुलिंग मशीन टेस्टिंगसाठी सहा लाख रुपये गुंतवा आणि पाच कोटींचा नफा मिळवा, असे आमिष दाखवून प्रॉपर्टी ब्रोकरला गंडविण्यात आले. याप्रकरणी जोगेश्वरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

तक्रारदार दयानंद जाधव (४१) याच्याकडे मित्र भालचंद्र राणे, योगेश कांबळे यांनी व्यावसायिक प्रस्ताव आणला. त्यांच्या ओळखीच्या अमोल जोशी याच्याकडे तांब्याची वस्तू असून, बाजारात त्याची किंमत ५०० कोटी आहे. मोठ्या कंपन्या ती वस्तू विकत घेतात आणि त्याचा नासामध्ये वापर केला जातो. हे अधिकृत असून, त्याचे सर्टिफिकेटदेखील असल्याचे त्यांनी सांगितले. 

मात्र त्या वस्तूच्या फॉरेन्सिक टेस्टसाठी ६ लाख रुपये कमी पडत आहेत, ही रक्कम तुम्ही भरल्यास त्याबदल्यात पाच कोटी रुपये देऊ, असे आमिष त्यांनी जाधव याला दाखविले. चांगला नफा मिळत असल्याने तो राणे आणि कांबळे यांच्यासोबत पुण्याच्या बॉम्बे बाजार येथील जोशीच्या कार्यालयामध्ये गेला. तेथे योगेश हरगुडे, सागर आवारे, पोपट गायकवाड, सुवर्णा धुळे बसले होते. ती तांब्याची वस्तू हरगुडे आणि आवारे बघून आले आहेत, असे जोशीने सांगितले. आम्ही पाच कोटी देऊच आणि काम नाही झाले तर तीन महिन्यांत तुमचे पैसे परत करू, असेही आश्वासन दिले. 

जीवे मारण्याची दिली धमकी पैसे भरल्यानंतर आरोपींनी चार-पाच दिवसांनंतर जाधव याला सोलापूर रोडच्या टेंभुर्णी या ठिकाणी तांब्याची वस्तू दाखवण्यासाठी बोलवले.  त्यानंतर वेगवेगळे बहाणे करून त्यांनी कोणतीही वस्तू जाधव याला दाखविली नाही.  फसवणूक झाल्याचे त्याच्या लक्षात आले.  आरोपींनी पुण्याचे ऑफिस बंद केले.  तसेच हरगुडेने जाधव आणि राणे यांना फोनवर जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच पैसे दिल्यावर तांब्याची वस्तू तुम्हाला दाखवू, असेही त्यांनी सांगितले.  आरोपींनी जाधव याच्याकडे पैशांचा तगादा लावल्याने त्याने अखेर आरटीजीएसमार्फत दि. ११ जानेवारी २०२२ रोजी पैसे पाठविले.  

टॅग्स :धोकेबाजी