धुक्यावर प्रदूषणाचे आक्रमण
By Admin | Updated: February 15, 2015 22:54 IST2015-02-15T22:54:39+5:302015-02-15T22:54:39+5:30
अशा शब्दांत सध्या रायगड जिल्ह्यात अनेक ठिकाणी येणाऱ्या अत्यंत दाट अशा धुक्याचा आनंद कवयित्री स्मिता सहस्त्रबुद्धे यांनी ‘लोकमत’करिता काव्यबद्ध केला.

धुक्यावर प्रदूषणाचे आक्रमण
जयंत धुळप, अलिबाग
‘तलम धुक्याची ओढणी सावरी, हरित वसना धरणी...
सूर्य भासतो चंद्र, जणु ही दाट धुक्याची करणी....
धूसर पडद्या आडून धुक्याच्या डोकावे सृष्टी....
कवी मनाला नकळत
लाभे सौंदर्याची दृष्टी.....’
अशा शब्दांत सध्या रायगड जिल्ह्यात अनेक ठिकाणी येणाऱ्या अत्यंत दाट अशा धुक्याचा आनंद कवयित्री स्मिता सहस्त्रबुद्धे यांनी ‘लोकमत’करिता काव्यबद्ध केला. तर त्याच वेळी त्यांनी, ‘‘धुक्यातले सौंदर्य म्हणू की, विळखा प्रदूषणाचा...
वायू विषारी रोखून धरती, श्वास परिसराचा...’’ अशा शब्दांत या धुक्यातील धोकाही अधोरेखित केला आहे.
पाली येथील जे. एन. पालीवाला कॉलेजचे उपप्राचार्य प्रा. सुधीर पुराणिक यांनी धुक्यात फिरण्याची मजा तर औरच आहे. पण कधी कधी मनात शंका येते की हे धुके नैसर्गिक आहे की वातावरणातील प्रदूषणाचा परिणाम आहे. मागील काही वर्षांपासून धुके जास्त दाट व काळपट होवू लागले आहे ही निश्चितच चिंतेची व गंभीरपणे विचार करण्याची बाब असल्याचे यानिमित्ताने त्यांनी सांगितले तर अलिबागच्या जे. एस. एम. कॉलेजचे प्राचार्य व पर्यावरणतज्ज्ञ डॉ. अनिल पाटील यांनी कवी कल्पनेतील धुके प्रचंड प्रमाणात वाढलेल्या औद्योगिकीकरणामुळे होणाऱ्या वायू प्रदूषणामुळे संपुष्टातच आल्याचा दावा केला आहे. परंतु मॉर्निंग वॉकला जाणारी मंडळी सध्या या धुक्याचा आपल्या सकारात्मकतेतून आनंद घेत आहेत. छायाचित्रकार आणि कवींना तर हे धुके नेहमीच एक पर्वणीच ठरते. हेच धुके विमाने आणि बोटींसाठी मात्र एक चिंतेची बाब ठरत असते. धुक्यांत हरवलेल्या डोंगरवाटा आणि नदी-सागरांचे किनारे यांच्या सौंदर्य कल्पनांच्या पलीकडे जावून या ‘धुक्यात’डोकावून पाहिले तर पर्यावरण, रसायन आणि भौतिक शास्त्रज्ञांच्या अभ्यासाचा एक मोठा विषय म्हणजे हे ‘धुके’ आहे.
दृश्यमानता १००० मी. पेक्षा अधिक म्हणजे धुके दृष्यमानता म्हणजेच, सामान्य दृष्टीच्या माणसाला नुसत्या डोळ्यांनी जास्तीत जास्त दूरच्या वस्तू नीट ओळखू येतील असे अंतर १००० मी. पेक्षा कमी असते असा जमिनीच्या किंवा पाण्याच्या पृष्ठाला स्पर्श करणारा ढग अर्थात ‘स्तरमेघ’ ज्याची दृश्यमानता १०००मी. पेक्षा अधिक असल्यास याच ढगाला ‘धुके’ म्हटले जाते. हा ढग जमिनीला स्पर्श न करता जमिनीजवळच तरंगत असला, तर त्याला धुके न म्हणता ‘स्तरमेघ’ म्हटले जाते.