सर्व्हिस रोडवर अवैध पार्किंग

By Admin | Updated: November 25, 2015 01:59 IST2015-11-25T01:59:57+5:302015-11-25T01:59:57+5:30

ठाणे-बेलापूर मार्गालगतच्या सर्व्हिस रोडवर होणाऱ्या अवैध वाहन पार्किंगमुळे वाहतुकीस अडथळा होत आहे. खाजगी कंपन्या व काही शोरूमची वाहने उभी करण्यासाठी हा रस्ता वापरला जात आहे.

Invalid parking on service road | सर्व्हिस रोडवर अवैध पार्किंग

सर्व्हिस रोडवर अवैध पार्किंग

नवी मुंबई : ठाणे-बेलापूर मार्गालगतच्या सर्व्हिस रोडवर होणाऱ्या अवैध वाहन पार्किंगमुळे वाहतुकीस अडथळा होत आहे. खाजगी कंपन्या व काही शोरूमची वाहने उभी करण्यासाठी हा रस्ता वापरला जात आहे. यामुळे त्याठिकाणी गंभीर अपघाताची देखील शक्यता निर्माण झाली आहे.
शहरातला जलदगती मार्ग म्हणून ठाणे - बेलापूर मार्ग ओळखला जातो. या मार्गाच्या पूर्वेला औद्योगिक पट्टा असल्याने त्यावरून जड- अवजड वाहनांची देखील सतत वर्दळ सुरू असते. यामुळे वाहतूक नियंत्रित करून अपघात टाळण्यासाठी ठाणे-बेलापूर मार्गाच्या पूर्वेकडे सर्व्हिस रोड बनवण्यात आला आहे. औद्योगिक क्षेत्रात जाण्यासाठी वळणाऱ्या वाहनांना हा उपयुक्त मार्ग ठरत असून त्यामुळे अपघाताचेही प्रमाण बहुतांश नियंत्रित झाले आहे. मात्र सर्व्हिस रोडलगतच्या काही कंपन्या आणि शोरूमधारकांनी या सर्व्हिस रोडवर स्वत:चा कब्जा मिळवल्याचे दिसत आहे. खैरणे येथील यू आकाराच्या पुलालगत हे चित्र मोठ्या प्रमाणात दिसत आहे. हा पूल कितपत वापरात आहे याबाबत शंका असतानाच पुलालगतच्या सर्व्हिस रोडची जागा मात्र वाहन पार्किंगसाठी पुरेपूर वापरली जात आहे. रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी केली जात असल्याने उर्वरित छोट्याशा मार्गातून इतर वाहनचालकांना वाहने चालवावी लागत आहेत. यामुळे भरधाव वाहनाकडून त्याठिकाणी अपघात होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. काही महिन्यांपूर्वी वाहतूक पोलिसांनी याच सर्व्हिस रोडवर उभ्या होणाऱ्या खाजगी वाहनांवर कारवाई देखील केली होती. मात्र पुलालगत उभ्या होणाऱ्या वाहनांवर कारवाईला तेव्हा दुर्लक्ष झाले होते. यामुळे संबंधितांची मर्जी सांभाळूनच सर्व्हिस रोडवर वाहने उभी केली जातात का? असा प्रश्न सर्वसामान्य वाहनचालकांना पडला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Invalid parking on service road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.