Join us  

जहांगीर कला दालनात कुंचल्यातून कॅनव्हासवर रेखाटले मनाचे अंतरंग 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2024 11:29 AM

चित्रकार मैत्री शाह यांचे ‘विंडोज ऑफ इनर एक्स्प्रेशन्स’ प्रदर्शनातून मानवी भावभावनांना कॅनव्हासवर रेखाटले आहे.

मुंबई :  चित्रकार मैत्री शाह यांचे ‘विंडोज ऑफ इनर एक्स्प्रेशन्स’ प्रदर्शनातून मानवी भावभावनांना कॅनव्हासवर रेखाटले आहे. कुलाबा येथील जहांगीर आर्ट कला दालनात आयोजित या प्रदर्शनात स्त्री ही मैत्री यांच्या सृजनशील कलाकृतींच्या केंद्रस्थानी आहे, तर स्त्रीच्या जीवनातील विविध छटा या चित्रांच्या माध्यमातून कलारसिकांना पाहायला मिळणार आहेत. हे प्रदर्शन २५ फेब्रुवारीपर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत कलारसिकांसाठी खुले राहणार आहे.

हे प्रदर्शन प्रतिकांमधून मानवी भावनांचे दर्शन रसिकांना घडवते. मैत्री या तैलरंग, चारकोल, ॲक्रेलिक अशा विविध माध्यमांचा एकाचवेळी कॅनव्हासवर यशस्विपणे वापर करून चित्रांमध्ये नाट्यमय भावभावना प्रतिबिंबित केल्या आहेत. मैत्री यांचे ब्रश स्ट्रोक्स हे उत्स्फूर्त आहेत, त्यामुळे एकाच वेळी सळसळते चैतन्य आणि दुर्दम्य आशावाद यांचे दर्शन मैत्री यांच्या चित्रातून घडते. या प्रदर्शनातील प्रत्येक कलाकृती ही मानवी मनोव्यापाराचे दर्शन घडवणारी ‘खिडकी’च आहे. या खिडकीतून मानवी सुख दुःख, भावविश्व, विचारांचे प्रतिबिंब यांचे दर्शन रसिकांना घडते.  

मैत्री शाह या दोन दशके चित्रकला क्षेत्रात कार्यरत आहेत. वयाच्या १२ व्या वर्षी त्यांनी जपान येथील कानागावा बिनालेमध्ये सहभाग नोंदविला. तिथे त्या रजत पदकाच्या मानकरी ठरल्या. पुढे त्यांनी चित्रकलेतच उच्चशिक्षण घेतले. मैत्री यांनी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्र प्रदर्शनात सहभाग नोंदविला आहे.

जपान, पोलंड, मॉरिशस, अहमदाबादनी गुफा यासारख्या महत्त्वाच्या ठिकाणी मैत्री यांची चित्रप्रदर्शने आयोजित झाली आहेत. त्याचबरोबर जयपूर, वडोदरा, मुंबई, पुणे, दिल्ली, कोलकाता या शहरांमध्ये त्यांची चित्रप्रदर्शने आयोजित झाली आहेत.  

टॅग्स :मुंबईकलाकुलाबा