International Yoga Day 2018 : 'मुस्लीम समाजाने योग स्वीकारावा'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 02:32 IST2018-06-21T02:32:02+5:302018-06-21T02:32:02+5:30
सांताक्रूझ पूर्वेकडील योगा इन्स्टिट्यूटमध्ये योगाचे धडे देणारे मुस्लिम बांधव इफ्तेहार अहमद फारुखी यांनी समाजात एक वेगळीच प्रतिमा निर्माण केली आहे.

International Yoga Day 2018 : 'मुस्लीम समाजाने योग स्वीकारावा'
मुंबई : सांताक्रूझ पूर्वेकडील योगा इन्स्टिट्यूटमध्ये योगाचे धडे देणारे मुस्लिम बांधव इफ्तेहार अहमद फारुखी यांनी समाजात एक वेगळीच प्रतिमा निर्माण केली आहे. सध्या त्यांचे वय ४१ आहे. ते इफ्तेहार मालाड पश्चिमेकडील मार्वे रोड येथे राहत असून, त्यांचे शिक्षण बी.कॉमपर्यंत झाले आहे. मुस्लीम समाजात योगाला स्थान मिळावे, याकरिता इफ्तेहार यांनी परंपरा बाजूला ठेवून या क्षेत्रात आपले नाव कोरले आहे. मागील आठ वर्षांपासून ते योगाचे धडे देण्याचे काम करत आहेत.
योगाविषय अधिक सांगताना इफ्तेहार फारुखी म्हणाले, आठ वर्षांपासून लोकांना योगाचे शिक्षण देण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत रेल्वे कर्मचारी, लष्करी अधिकारी, पोलिसांना योगाचे धडे दिले आहेत. मन, ऊर्जा, शरीर, संवेदना इत्यादींना स्थिर ठेवण्याचे काम योग करते. जीवनात कसे जगावे, याचे मार्ग योगातून सापडतात. त्यामुळे योग प्रत्येकाच्या आयुष्यात असणे गरजेचे आहे, असेही इफ्तेहार फारुखी यांनी सांगितले.
इफ्तेहार फारुखी म्हणाले की, काही वर्षांपूर्वी माझा अपघात झाला होता. अपघात झाल्यावर कित्येक दिवस जागेवरच पडून होतो. परंतु योग करून मी स्वत:ला बरा करू शकलो. योग हे आयुष्यातील प्रत्येक घटकावर काम करते. योगाचे प्रशिक्षण घेत असताना सुरुवातील घरातून हवी तशी मदत मिळाली नाही. मुस्लीम समाजात योग करीत नाहीत, मग तू का करतोस? अशा प्रकारे प्रश्न समाजातून विचारले जाऊ लागले. मी घरच्यांना समजावले की, योग हा कुठल्या एका धर्माचा किंवा समाजाचा नाही. कालांतराने घरतील इतर सदस्यांनी योगासाठी प्रोत्साहन दिले. वडिलांना समजावण्यास वेळ लागला. मात्र, योग क्षेत्रात मुलाची होणारी प्रगती पाहिल्यावर त्यांनीही मला प्रोत्साहन दिले.