मुंबईत उद्यापासून आंतरराष्ट्रीय बाल चित्रपट महोत्सव
By Admin | Updated: November 27, 2015 02:42 IST2015-11-27T02:42:25+5:302015-11-27T02:42:25+5:30
जगातील नावाजलेल्या बाल चित्रपट महोत्सवांपैकी एक असलेल्या ९ व्या चिन्ह इंडिया किड्स फिल्म फेस्टिव्हलची उद्या २८ नोव्हेंबरला मुंबईत दमदार सुरुवात होणार आहे

मुंबईत उद्यापासून आंतरराष्ट्रीय बाल चित्रपट महोत्सव
मुंबई : जगातील नावाजलेल्या बाल चित्रपट महोत्सवांपैकी एक असलेल्या ९ व्या चिन्ह इंडिया किड्स फिल्म फेस्टिव्हलची उद्या २८ नोव्हेंबरला मुंबईत दमदार सुरुवात होणार आहे. या महोत्सवात ७ देशांमधील जवळपास ४५ बाल चित्रपट दाखवले जातील आणि १५00 शाळांमधील सुमारे २0 लाख मुलांना याचा लाभ घेता येईल. २८ नोव्हेंबरला घाटकोपरमधील सोमय्या स्कूल आणि ३0 नोव्हेंबरला विलेपार्लेतील भाईदास हॉल येथे हा सोहळा पार पडेल.
हा जगातील एकमेव चित्रपट महोत्सव आहे, जिथे सर्व परीक्षक हे १५ वर्षांखालील मुले आहेत. या चित्रपट महोत्सवाची संकल्पना मांडणाऱ्या मिनाक्षी विनय राय म्हणाल्या, ‘प्रौढ व्यक्तींपेक्षा लहान मुलांची विचार करण्याची पद्धत खूप वेगळी असते आणि तशाच त्यांच्या आवडी-निवडी, एकाग्रता आणि भावभावनाही. मुलांसाठी जे मनोरंजक असते ते प्रौढांसाठी बऱ्याचदा दमवणारे असते. म्हणूनच लहान मुलांच्या चित्रपट महोत्सवाचे परीक्षण मोठ्यांनी करणे ही संकल्पनाच अयोग्य आहे.’
या चित्रपट महोत्सवातील मुख्य संकल्पना ‘आशा’ ही आहे. या महोत्सवात या चित्रपटांचे स्क्रीनिंग, माध्यम साक्षरता शिबिर, केस स्टडिज आणि काही विशेष फोरम्सचा समावेश असणार आहे. हे कदाचित जगातील एकमेव फोरम असेल जिथे चित्रपट केवळ ‘लहान मुलांसाठी’ बनवले जात नाहीत तर ते ‘लहान मुलांनीच’ बनवलेले असतात. मिनाक्षी राय म्हणाल्या, ‘इथे जसे आम्ही सर्वोत्तम बाल चित्रपट बनवणाऱ्या दिग्दर्शकांच्या चित्रपटांचे स्क्रीनिंग करतो, तसेच लहान मुलांनी स्वत: बनवलेल्या चित्रपटांचे स्क्रीनिंगही करतो. यामुळे माध्यमांविषयी त्यांना असलेले कुतूहल शमते आणि चित्रपट निर्मितीत त्यांना रस निर्माण होतो. मागील ८ वर्षांत भारतातील लहान मुलांनी बालकांच्या समस्या डोळ्यांसमोर ठेवून बनवलेल्या चित्रपटांद्वारे या महोत्सवात भाग घेतला आहे. यातील काही
चित्रपट हे अतिशय सुज्ञपणे बनवण्यात आले होते. लहान मुलांच्या कल्पनाशक्तीला कधीही कमी लेखू नका.’ (प्रतिनिधी)