Join us  

गौतम नवलखांसह तिघांना अंतरिम दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2018 4:55 AM

कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी सुनावणी २१ नोव्हेंबरपर्यंत तहकूब

मुंबई : कोरेगाव भीमा येथील जातीय हिंसाचाराप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या गौतम नवलखा, प्रा. आनंद तेलतुंबडे आणि झारखंडचे मानवाधिकार कार्यकर्ते फादर स्टान स्वामी यांना उच्च न्यायालयाने २१ नोव्हेंबरपर्यंत अंतरिम दिलासा दिला आहे.गुन्हा रद्द करण्यासाठी तिघांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत. त्यावरील सुनावणी न्या. रणजीत मोरे व न्या. भारती डांगरे यांच्या खंडपीठापुढे होती. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयातही याचिका असल्याने उच्च न्यायालयाने तेथील सुनावणी झाल्यावर येथे सुनावणी घेऊ, असे सांगत सुनावणी २१ नोव्हेंबरपर्यंत तहकूब केली. गेल्या सुनावणीत न्यायालयाने पोलिसांना या तिघांना अटक न करण्याचे व कठोर कारवाई न करण्याचे निर्देश दिले होते.गौतम नवलखा या प्रकरणी नजरकैदेत होते. मात्र, दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांची मुक्तता केली. तेलतुंबडे, स्वामी यांच्या घरांवर, कार्यालयांवर पुणे पोलिसांनी छापे टाकले. मात्र अटक केली नाही. नवलखा यांच्यासह अरुण फरेरा, वेर्नोन गोन्सलविस, सुधा भारद्वाज, वरावरा राव यांनाही अटक करण्यात आली होती. या सर्वांचा माओवाद्यांशी संबंध असल्याचा संशय पोलिसांना आहे. ‘आरोपीचा मृत्यू झाल्यावर रुग्णालयात नेणार का?’ पुणे : नक्षली चळवळीशी संबंध असल्याप्रकरणी अटकेत असलेला संशयित आरोपी महेश राऊत याने कारागृह पोलिसांनी तीन आठवड्यांपासून तज्ज्ञ डॉक्टरांकडे नेले नसल्याची तक्रार गुरुवारी न्यायालयात केली. त्यामुळे बंदीला काय मृत्यू झाल्यावर रुग्णालयात नेणार का? असा संतप्त सवाल न्यायालयाने केला.

टॅग्स :कोरेगाव-भीमा हिंसाचार