Join us
Daily Top 2Weekly Top 5

ओमानच्या दौऱ्यावरून परतली ‘आयएनएसव्ही कौंडिण्य’, पारंपरिक बांधणीची नौका युवांसाठी प्रेरणादायी : सेठ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 06:59 IST

भारतीय नौदलाची पारंपरिक शिडाची नौका INSV Kaundinya हिने ओमानमधील मस्कतचा आपला पहिला ऐतिहासिक प्रवास पूर्ण केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पारंपरिक पद्धतीने बांधलेली भारतीय नौदलाची शिडाची नौका ‘आयएनएसव्ही कौंडिण्य’ ओमानमधील मस्कत येथून पहिला ऐतिहासिक परदेश प्रवास पूर्ण करून भारतात परतली. या यशस्वी मोहिमेनंतर मुंबईतील नौदल तळावर संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांनी नौकेचे औपचारिक स्वागत केले.

मंत्री सेठ म्हणाले, आयएनएसव्ही कौंडिण्य भारताच्या प्राचीन सागरी ज्ञान प्रणालीच्या  पुनरुत्थानाचे प्रतीक आहे आणि ते देशातील युवा पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल. या प्रवासातून प्रतिबिंबित धाडस, चिकाटी  आणि शोधक वृत्ती अधोरेखित करून त्यांनी युवा भारतीयांना आपल्या सांस्कृतिक आत्मविश्वासावर आधारलेल्या साहसासाठी प्रोत्साहन दिले.

अरबी समुद्रात पारंपरिक नौकेतून केलेल्या प्रवासादरम्यान नौकेवरील कर्मचाऱ्यांच्या समर्पित व व्यावसायिक वृत्तीचे पश्चिम नौदल कमांडचे प्रमुख  व्हाइस ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांनी कौतुक केले. संकल्पना मांडण्यापासून संशोधनापर्यंत आणि आरेखनापासून पारंपरिक जहाज बांधणी, प्रत्यक्ष प्रवासात कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या परिश्रमांचीही त्यांनी प्रशंसा केली. आधुनिक संरचनात्मक बळकटीशिवाय  पारंपरिक पद्धतीने बांधलेली लाकडी नौका समुद्रात चालवण्यासाठी काटेकोर नियोजन, नौकानयन कौशल्य, संघटन कौशल्य आणि सहनशीलता आवश्यक असते. हा यशस्वी प्रवास म्हणजे नौदलाचे उल्लेखनीय यश आहे, असे ते म्हणाले.   

भारतात परतल्यानंतर दिमाखदार संचलन आणि जलसलामीद्वारे या नौकेचे स्वागत करण्यात आले. यावेळी ओमानच्या दूतावासाचे महावाणिज्यदूत  महबूब इस्सा अलरैसी, वरिष्ठ अधिकारी, निवृत्त अधिकारी उपस्थित होते.

पारंपरिक पद्धतीने बांधलेली नौकाआयएनएसव्ही कौंडिण्य  ही भारतीय नौदलाची २० मीटर लांब, अजिंठा लेण्यांमधील ५व्या शतकातील शिल्पापासून प्रेरणा घेऊन, पारंपरिक पद्धतीने बांधलेली नौका आहे. ही नौका प्राचीन भारतीय जहाजबांधणी तंत्रज्ञानाचा वापर करून बांधण्यात आली आहे. यामध्ये लाकडी फळ्या दोरखंडाच्या साह्याने एकमेकांना बांधलेल्या असून, त्या नैसर्गिक चिकट द्रव्यांनी चिकटवलेल्या आहेत. ही नौका भारताच्या समृद्ध सागरी परंपरेचे प्रतिनिधित्व करते. ही नौका २०२५च्या मेमध्ये नौदलात दाखल झाली. प्रसिद्ध दर्यावर्दी कौंडिण्य  यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ तिला  कौंडिण्य हे नाव देण्यात आले.

English
हिंदी सारांश
Web Title : INSV Kondinya Returns from Oman, Inspiring Youth with Tradition

Web Summary : INSV Kondinya, a traditional Indian Navy sailing vessel, completed its maiden overseas voyage from Muscat, Oman. Minister Sanjay Seth welcomed the ship, highlighting its significance as a symbol of India's maritime heritage and an inspiration for young Indians to embrace their cultural confidence and explore maritime adventures.
टॅग्स :भारतीय नौदल