बंडखोर शिवसैनिकांना लागले घरवापसीचे वेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2015 00:39 IST2015-05-17T00:39:38+5:302015-05-17T00:39:38+5:30
नवी मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये उमेदवारी नाकारल्यामुळे बंंडखोरी केलेल्या शिवसैनिकांना आता घरवापसीचे वेध लागले आहेत.
बंडखोर शिवसैनिकांना लागले घरवापसीचे वेध
नामदेव मोरे ल्ल नवी मुंबई
नवी मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये उमेदवारी नाकारल्यामुळे बंंडखोरी केलेल्या शिवसैनिकांना आता घरवापसीचे वेध लागले आहेत. आम्ही शिवसैनिकच असून पक्षाचे अस्तित्व टिकविण्यासाठीच निवडणूक लढविल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. यामुळे पक्षाचे नेते काय भूमिका घेणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये शिवसेना पहिल्या क्रमांकाचा पक्ष होईल, असे वातावरण निर्माण झाले होते. परंतु निवडणुकीत युतीची घोषणा झाली व भारतीय जनता पक्षाला ४३ जागा देण्यात आल्या. यामुळे शिवसेनेमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला. शिवसैनिकांनी बंडखोरी करून अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. नेरूळमध्ये उपजिल्हा प्रमुख के. एन. म्हात्रे यांचा मुलगा गिरीश म्हात्रे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला व निवडणूक जिंकली. इतरांनी मात्र दुसऱ्या पक्षात न जाता स्वतंत्रपणे ताकद आजमावली. ४१ बंडखोरांपैकी सीमा गायकवाड या प्रभाग ३१ मधून विजयी झाल्या. १० ठिकाणी बंडखोरांनी दुसऱ्या स्थानापर्यंत मजल मारली. १६ ठिकाणी तिसऱ्या क्रमांकावर गेले. बंडखोरांनी तब्बल २०,१६३ मते मिळविली आहेत. सहा जणांनी एक हजारपेक्षा जास्त मते मिळविली आहेत. भाजपाचे व काही ठिकाणी शिवसेनेचे उमेदवारही बंडखोरांमुळे पडले. युतीवर सर्व स्तरातून टीका झाल्यामुळे त्याचा निकालावर परिणाम झाला व सत्तेची स्वप्न पाहणाऱ्या युतीला पुन्हा विरोधी पक्षात बसावे लागले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही बंडखोरांची हकालपट्टी करण्याचे आदेश दिले होते. निवडणुकीनंतरच्या सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमात ठाणे जिल्ह्णाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, उपनेते विजय नाहटा यांनीही जे गैरसमजातून गेले त्यांचा विचार करू, परंतु ज्यांनी पक्षाशी गद्दारी केली त्यांना माफ केले जाणार नसल्याचे स्पष्ट केले होते.
निवडणुका संपताच बंडखोर शिवसैनिकांना पुन्हा शिवसेनेचे वेध लागले आहेत. जिंकून आलेल्या सीमा गायकवाड यांनी राष्ट्रवादीला पाठिंबा दिला आहे. घनशाम मढवी यांनीही तोच कित्ता गिरविला आहे. इतर बहुतांश पदाधिकाऱ्यांनी मात्र अद्याप कोणत्याही पक्षात प्रवेश केलेला नाही. बहुतांश बंडखोरांनी पुन्हा शिवसेनेत सक्रिय होण्याची तयारी केली आहे. विरोधी पक्ष नेतेपदी विजय चौगुले यांची निवड झाल्यानंतर अनेकांनी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी होर्डिंग लावले होते. काही पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देतानाही होर्डिंगवर शिवसेनेचाच उल्लेख केला होता.
च्आम्ही पक्षाचे अस्तित्व टिकविण्यासाठी निवडणूक लढली. पक्षाचे चिन्ह नसतानाही नागरिकांनी मोठ्याप्रमाणात मते दिली आहेत. भविष्यातही शिवसेनेमध्ये राहूनच पक्षाचे काम करण्याची इच्छा असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. यामुळे आता पक्षाचे नेते काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
निवडणुकीमध्ये बंडखोरी केलेल्या अनेक पदाधिकाऱ्यांनी पुन्हा पक्षात काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ज्यांनी गैरसमजातून बंडखोरीची भूमिका घेतली होती, त्यांना पुन्हा पक्षात प्रवेश देण्याविषयी सकारात्मक विचार केला जाईल. ज्यांनी जाणीवपूर्वक पक्ष बदनाम करण्याचा प्रयत्न केला त्यांना कोणत्याही स्थितीमध्ये पुन्हा प्रवेश दिला जाणार नाही.
- विजय नाहटा, उपनेते, शिवसेना