कामगार कल्याण मंडळ कर्मचाऱ्यांना विमा कवच
By Admin | Updated: July 4, 2015 00:58 IST2015-07-04T00:58:13+5:302015-07-04T00:58:13+5:30
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य विमा योजना लागू करण्याची घोषणा मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र गावित यांनी केली आहे.

कामगार कल्याण मंडळ कर्मचाऱ्यांना विमा कवच
मुंबई : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य विमा योजना लागू करण्याची घोषणा मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र गावित यांनी केली आहे. मंडळाच्या ६२व्या वर्धापन दिनानिमित्त एलफिन्स्टन येथील कामगार क्रीडा भवनात बुधवारी रात्री पार पडलेल्या कार्यक्रमात गावित बोलत होते.
आरोग्य विमा योजनेंतर्गत कर्मचाऱ्यासह त्याची पत्नी किंवा पती, दोन मुले आणि आई-वडील यांनाही वैद्यकीय खर्चासाठी तीन लाखांपर्यंत मदत मिळू शकेल, असे गावित यांनी सांगितले. ते म्हणाले की, कर्मचारी अपघातात विकलांग झाल्यास किंवा त्याचा मृत्यू झाल्यास कुटुंबाला पाच लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत देण्यात येईल. मंडळाचे कल्याण आयुक्त नरेंद्रसिंह नागभिरे यांनी कामगार पाल्यांसाठी लवकरच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग सुरू करणार असल्याचे सांगितले. शिवाय संगणक प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यासाठी राज्यभरातून अनेक संस्थांकडून प्रस्ताव आल्याची माहिती त्यांनी दिली.
या वेळी मुंबईचे माजी नगरपाल डॉ. जगन्नाथ हेगडे, माजी महापौर महादेव देवळे, श्रमविज्ञान संस्थेचे संचालक डॉ. राजन तुंगारे, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य मंडळाचे संचालक जयेंद्र मोटघरे, मंडळ सदस्य गोविंदराव मोहिते
आदी मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)