Join us  

काँग्रेस प्रिया दत्त यांच्याऐवजी नगमा यांना उतरवणार लोकसभेच्या मैदानात?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2018 10:44 AM

माजी खासदार प्रिया दत्त यांना पक्षाच्या सचिवपदावरून डच्चू दिल्यानंतर पक्षाकडून त्यांना अजून एक धक्का देण्याची तयारी सुरू झाल्याची चर्चा आहे.

मुंबई - माजी खासदार प्रिया दत्त यांना पक्षाच्या सचिवपदावरून डच्चू दिल्यानंतर पक्षाकडून त्यांना अजून एक धक्का देण्याची तयारी सुरू झाल्याची चर्चा आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मुंबईतील लोकसभेच्या उत्तर मध्य मतदारसंघातून प्रिया दत्त यांच्याऐवजी अभिनेत्री नगमा यांना उमेदवारी देण्यात येण्याची शक्यता आहे. अभिनेत्री नगमा यांनी उत्तर प्रदेश, राजस्थान आणि कर्नाटकमध्ये काँग्रेससाठी अनेक रोड शो केले आहेत. दरम्यान, रविवारी झालेल्या काँग्रेसच्या मुंबईतील उत्तर मध्य मतदारसंघातील पक्षाच्या बैठकीत नगमा उपस्थित राहिल्याने याला दुजोरा मिळत आहे. मात्र प्रिया दत्त याच या मतदारसंघातून काँग्रेसकडून खऱ्या दावेदार असल्याचे पक्षातील काही नेत्यांकडून सांगितले जात आहे. सुनील दत्त यांच्या कन्या असलेल्या प्रिया दत्त यांनी या मतदारसंघातून दोन वेळा विजय मिळवला होता. सुनील दत्त यांच्या निधनानंतर 2005 साली झालेल्या पोटनिवडणुकीत आणि 2009च्या लोकसभा निवडणुकीत त्या विजयी झाल्या होत्या. मात्र 2014 साली त्यांना पराभव पत्करावा लागला होता. दरम्यान, मुंबईतीलस उत्तर पश्चिम मतदारसंघातूनही नगमा यांनी उमेदवारी देण्यात येऊ शकते, अशी शक्यता एका काँग्रेस कार्यकर्त्यांने वर्तवली आहे. या मतदारसंघातून काँग्रेसचे दिवंगत नेते गुरुदास कामत निवडणूक लढवत असत. त्यांच्या निधनामुळे आता या मतदारसंघातून नगमा यांना उमेदवारी देता येऊ शकेल. तसेच प्रिया दत्त यांना पुन्हा एकादा उत्तर मध्य मतदारसंघातून उमेदवारी दिली गेल्यास नगमा यांना उत्तर पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी देण्यात येऊ शकते.  

टॅग्स :काँग्रेसमुंबईराजकारणप्रिया दत्त