आजच्या पिढीसाठी प्रेरणास्थान
By Admin | Updated: May 11, 2015 04:15 IST2015-05-11T04:15:05+5:302015-05-11T04:15:05+5:30
ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर आजच्या पिढीसाठी प्रेरणास्थान आहेत, अशा शब्दांमध्ये केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अरुण जेटली यांनी शशी कपूर यांची प्रशंसा केली.
आजच्या पिढीसाठी प्रेरणास्थान
मुंबई : ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांनी चित्रपट क्षेत्रातील आपल्या कारकिर्दीत मोलाची भूमिका पार पाडली. ते आजच्या पिढीसाठी प्रेरणास्थान असून, एका अत्यंत मोठ्या परंपरेचे प्रतिनिधी आहेत, अशा शब्दांमध्ये केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अरुण जेटली यांनी शशी कपूर यांची प्रशंसा केली. ज्येष्ठ अभिनेते-निर्माते शशी कपूर यांना अत्यंत मानाचा समजला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार रविवारी प्रदान करण्यात आला. पृथ्वी थिएटरमध्ये आयोजित सोहळ्यात केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अरुण जेटली यांच्या हस्ते कपूर यांना सुवर्णकमळ, १० लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि शाल देऊन या पुरस्काराने गौरविण्यात आले
चित्रपट क्षेत्रातील अभूतपूर्व योगदानाबद्दल केंद्र सरकारच्या वतीने चित्रपट क्षेत्रातील हा सर्वोच्च सन्मान दिला जातो. प्रकृती अस्वास्थ्यामुळे शशी कपूर दिल्लीतील सोहळ्याला उपस्थित राहू शकले नव्हते. त्यामुळे मुंबईत शशी कपूर यांना पुरस्कार प्रदान करण्यासाठी या खास सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. शशी कपूर यांना ४६व्या दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
या पुरस्कार सोहळ्याला ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन, ज्येष्ठ दिग्दर्शक श्याम बॅनेगल, गोविंद निहलानी, आशा पारेख, हेमा मालिनी, रेखा, आशा भोसले, जावेद अख्तर, शबाना आझमी, झिनत अमान, कृष्णा कपूर, सैफ अली खान आदी चित्रपट क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते. ऋषी कपूर, रणबीर कपूर, कुणाल कपूर आणि संजना कपूर आदी कुटुंबातील सदस्यही या कार्यक्रमाला उपस्थित होते. या सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे शशी कपूर यांचा नातू आणि बॉलिवूडचा सुपरस्टार रणबीर कपूर याच्या आवाजातली खास डॉक्युमेंट्रीही दाखवण्यात आली. (प्रतिनिधी)