Join us  

कर्नलच्या वेशात विधानभवनात प्रवेश करणारा अटकेत!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2019 2:47 AM

सैन्य दलात भरती होऊन कर्नल होण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही, म्हणून उत्तर प्रदेशातील तरुणाने सैन्य दलाच्या पोषाखात थेट विधानभवनात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला.

मुंबई : सैन्य दलात भरती होऊन कर्नल होण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही, म्हणून उत्तर प्रदेशातील तरुणाने सैन्य दलाच्या पोषाखात थेट विधानभवनात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांना संशय आल्याने, त्यांनी हटकताच त्याचे बिंग फुटले. कार्तिकेय प्रताप सिंह (१८) असे तरुणाचे नाव असून, मरिन ड्राइव्ह पोलिसांनी त्याला अटक केली आहे.पावसाळी अधिवेशन सुरू असताना, १९ जून रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास सिंहने कर्नलच्या वेशात मुख्य प्रवेशद्वारातून आत जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तेथे कर्तव्यावर असलेल्या पोलिसाने त्याच्याकडे चौकशी केली. त्याने तो सैन्य दलात कर्नल असल्याचे सांगून ओळखपत्र दाखवले. ओळखपत्रा-बाबत संशय आल्याने त्यांनी त्याची अधिक चौकशी केली. तपासात तो कर्नल नसल्याचे स्पष्ट झाले. त्याला मरिन ड्राइव्ह पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. मरिन ड्राइव्ह पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.केवळ कर्नलच्या वेशात त्याला मिरवायचे होते, असे त्याने पोलिसांना सांगितले. त्याला लहानपणापासून सैन्य दलात दाखल व्हायचे होते. मात्र हे स्वप्न प्रत्यक्षात न आल्यानेच हा प्रताप केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. या प्रकरणाची पोलीस अधिक शहानिशा करत आहेत.

टॅग्स :मंत्रालयमुंबई