आयुक्त सहआयुक्तांसह वरिष्ठांची भावनांक तपासणी
By Admin | Updated: May 12, 2015 04:34 IST2015-05-12T04:34:17+5:302015-05-12T04:34:17+5:30
वाकोला गोळीबार प्रकरणानंतर मुंबई पोलीस दलातील अधिकारी आणि जवानांच्या भावनांक तपासणी उपक्रमाला सुरुवात झाली आहे

आयुक्त सहआयुक्तांसह वरिष्ठांची भावनांक तपासणी
मुंबई : वाकोला गोळीबार प्रकरणानंतर मुंबई पोलीस दलातील अधिकारी आणि जवानांच्या भावनांक तपासणी उपक्रमाला सुरुवात झाली आहे. याचाच भाग असलेली मानसिक स्थिती तपासणीची प्रश्नावली पोलीस आयुक्त राकेश मारिया, सहआयुक्त देवेन भारती याच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सोमवारी भरली.
मुंबई पोलीस दलात ५० हजारांहून अधिक कर्मचारी वर्ग कार्यरत आहे. या अंतर्गत मुंबईतील सर्व स्थानिक पोलीस ठाण्यासह गुन्हे शाखा, विभागीय कार्यालये अशा सर्व ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून मानसिक तपासणीचा उपक्रम राबविण्यात येत आहे. मानसोपचार तज्ज्ञांनी यासाठी एक प्रश्नावली तयार केली आहे. तीन सेटच्या असलेल्या या प्रश्नावलीत प्रत्येक सेटमध्ये सुमारे २५ प्रश्न आहेत. त्याआधारे पोलिसांवर असलेल्या ताणाची पातळी समजू शकेल. या प्रश्नांची दिलेली उत्तरे ही मानसोपचार तज्ज्ञांकडून तपासण्यात येणार आहेत. त्याआधारे पोलीस कर्मचाऱ्यांच्या मानसिक स्थितीची नोंद करण्यात येणार आहे.
पोलीस ठाणे पातळीवर ही प्रश्नावली भरून घेण्याची जबाबदारी विभागीय उपायुक्तांवर सोपविण्यात आली आहे. आयुक्त राकेश मारिया, सहआयुक्त देवेन भारतीसह वरिष्ठांनी सोमवारी या उपक्रमातील प्रश्नावलीतील उत्तरे भरून उपक्रमास सुरुवात केली.
पोलिसांवरील ताणाची पातळी तपासण्यासाठी या उपक्रमाचा फायदा होणार आहे. यामध्ये माहिती देताना अधिकारी आणि कर्मचारी वर्गाने न घाबरता खरी माहिती लिहिणे गरजेचे आहे. या माहितीचा त्यांच्या नियुक्ती आणि बढतीवर कोणताही परिणाम होणार नाही, असे कायदा व सुव्यवस्था सहआयुक्त देवेन भारती यांनी सांगितले. (प्रतिनिधी)