स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी अभिनव आदर्श चौकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 01:32 AM2020-02-26T01:32:03+5:302020-02-26T01:32:06+5:30

कर्मचाऱ्यांच्या विश्रांती आणि मनोरंजनाची सोय

Innovative ideal outpost for sanitation workers | स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी अभिनव आदर्श चौकी

स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी अभिनव आदर्श चौकी

Next

मुंबई : स्वच्छता कर्मचारी दिवसातील कित्येक तास ऊन-पावसाची पर्वा न करता रस्ते, पदपथ, मैदान, गटारे व नागरी परिसर स्वच्छ ठेवत असतात. याच स्वच्छता कर्मचाºयांच्या विश्रांती व मनोरंजनासाठी कुर्ला पश्चिम येथील अंधेरी - कुर्ला मार्गावर एक अभिनव आदर्श चौकी उभारण्यात आली आहे.

महानगरपालिकेच्या एल वॉर्ड व टाटा ट्रस्टतर्फे ही चौकी उभारण्यात आली आहे. स्वच्छता कर्मचाºयांना दररोज काम करताना सुरक्षित, आरोग्यदायी तसेच दिवसभराचा ताण हलका होण्यासाठी टाटा ट्रस्ट राबवत असलेल्या ‘मिशन गरिमा’ या उपक्रमाचा एक भाग म्हणून या चौकीचे अनावरण करण्यात आले. या चौकीचा उपयोग दररोज ८० ते १०० कामगारांना होणार आहे. याआधी स्वच्छता कर्मचारी वापर करीत असलेल्या चौकीमध्ये कमी सुविधा होत्या. ज्यात खाली बसणे ही शक्य नव्हत. त्यामुळे कपडे बदलताना तसेच जेवताना त्रास व्हायचा. परंतु नवीन चौकीमुळे अत्यंत चांगल्या सुविधा मिळत आहेत. यामुळे आमच्यावरील ताणही कमी होत आहे, असे स्वच्छता कर्मचारी शीतल निकम यांनी सांगितले.

चौकीबाबत कामगारांसोबत चर्चा
कामगारांना सुदृढ व सुखी आयुष्य जगता यावे यासाठी टाटा ट्रस्ट हा उपक्रम आहे. गरिमा चौकी उभारण्यासाठी एल वॉर्डचे साहाय्यक आयुक्त मनीष वळंजू यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच टाटा ट्रस्टचे दिव्यांग वाघेला यांनी चौकी उभारण्यासाठी विशेष पुढाकार घेतला. या चौकीची रचना व त्यातील सोयीसुविधा या कामगारांच्या इच्छेप्रमाणे ठेवण्यात आल्या आहेत. यासाठी कामगारांसोबत अनेकदा चर्चा झाली, असे टाटा ट्रस्टच्या सल्लागार सीमा रेडकर यांनी सांगितले.

अभिनव आदर्श चौकीत काय आहे?
कार्यालयीन जागा, स्त्री व पुरुष कर्मचाºयांना विश्रांती घेण्यासाठी स्वतंत्र खोल्या, वस्तू ठेवण्यासाठी स्टोरेज रूम तसेच समारंभासाठी खुली जागा, या खोल्यांमध्ये पडदे, चटया, लॉकरची सुविधा, स्त्री-पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे तसेच पिण्यासाठी स्वच्छ पाणी, अन्न गरम करण्यासाठी मायक्रोव्हेव ओवन, जेवणासाठी डायनिंग टेबल, कामाचा ताण हलका करण्यासाठी कॅरम बोर्ड, लुडो, बुद्धिबळ यांसारखे खेळ, आरोग्य चांगले राहावे यासाठी खुली व्यायामशाळा, वेळोवेळी आरोग्य चाचणी.

टाटा ट्रस्ट व महानगरपालिकेने आम्हाला हव्या असणाºया सर्व सोयीसुविधा या चौकीमध्ये उपलब्ध करून दिल्या आहेत. मुंबईत सर्व ठिकाणी अशा प्रकारच्या चौक्या उभ्या राहणे गरजेचे आहे. जेणेकरून स्वच्छता कर्मचाºयांना दिवसभर काम केल्यानंतर कोणतीही अडचण भासणार नाही.
- रवी बुंबक, स्वच्छता कर्मचारी

Web Title: Innovative ideal outpost for sanitation workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.