गिधाडांच्या घरट्यांची माहिती द्या
By Admin | Updated: February 17, 2015 02:25 IST2015-02-17T02:25:54+5:302015-02-17T02:25:54+5:30
गिधाडांच्या घरट्यांची माहिती दिल्यास सह्याद्री निसर्ग मित्र या स्वयंमसेवी संस्थेतर्फे १ हजार रुपये बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.

गिधाडांच्या घरट्यांची माहिती द्या
मुंबई : कोकणातील श्रीवर्धन, चिरगाव, विहाली, नाणेमाची आणि रानवडी ही पाच गावे सोडून कोकणातील इतर भागात सध्या असलेल्या गिधाडांच्या घरट्यांची माहिती दिल्यास सह्याद्री निसर्ग मित्र या स्वयंमसेवी संस्थेतर्फे १ हजार रुपये बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.
वन विभागाच्या मार्गदर्शनाखाली सह्याद्री निसर्गमित्र संस्थेच्या वतीने कोकणातील रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात गिधाडांचे संवर्धन, संरक्षण आणि जनजागृती प्रकल्प राबविण्यात येत आहेत. माणगावपासून दक्षिणेकडील पूर्ण कोकण परिसरात केलेल्या सर्वेक्षणानुसार श्रीवर्धन आणि चिरगाव येथे पांढऱ्या पाठीची गिधाडे तर विहाली, नाणेमाची आणि रानवडी येथे लांब चोचीच्या गिधाडांच्या वसाहती असल्याचे आढळून आले आहे. एवढ्या मोठ्या परिसरात फक्त पाच गावांमध्ये असलेल्या गिधाडांच्या वसाहती लक्षात घेता गिधाड संवर्धनाच्या कामामध्ये वन विभाग, पशु संवर्धन विभागाच्या बरोबरीनेच ग्रामपंचायत, स्थानिक, औषध विक्रेते, पर्यटक या सर्वांना समाविष्ट करून सह्याद्री काम करीत आहे. श्रीवर्धन येथे सर्वात जास्त म्हणजे ३० घरटी आहेत. ही सर्व घरटी नारळाच्या झाडांवर आहेत. या घरट्यांमुळे नारळमालक झाडाचे उत्पन्न सहा महिने वापरू शकत नाही. यासाठी वन विभागातर्फे २००८ साली ४०० रुपये इतकी नुकसानभरपाई मंजूर झाली होती. आता ती नुकसानभरपाई १ रुपये हजार इतकी व्हावी, म्हणून प्रयत्न केले जात आहेत. गिधाडांची जोडी दरवर्षी फक्त एकच अंडे देते. म्हणूनच त्यांचे प्रत्येक घरटे वाचवणे हे किती महत्त्वाचे आहे, हे सर्वांनी लक्षात घेऊन या कामात सहभागी झाले पाहिजे. गिधाडांच्या वसाहती पाहण्यास उत्सुक निसर्गप्रेमी पर्यटकांनाही अशा ठिकणांना भेट देऊन तेथे सुरू असणाऱ्या कामात सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेचे कार्यवाह उदय पंडित यांनी केले आहे. (प्रतिनिधी)
च्गुरांच्या उपचारासाठी डायक्लोफेनॅक या औषधाचा वापर न करण्यासाठी औषध विक्रेत्यांच्याबरोबरीने काम केले जात आहे.गावामधील पशुपालकांसाठी नियमित गुरे तपासणी शिबिर, गुरांचे औषध नोंदकार्ड वाटप अशी कामेही केली जात आहेत.
च्ज्या गावांमधून मेलेली गुरे उघड्यावर टाकली जातात, अशा ठिकाणी जर गिधाडे येत असतील तर संस्थेला त्याची जरूर माहिती द्यावी. शिवाय अशा जागेला कुंपण घालून भटक्या कुत्र्यांचा उपद्रव टाळावा, असा प्रचारही केला जात आहे.