Join us  

इंडिगो विमानाचे सात तासांनंतर उड्डाण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2019 7:01 AM

प्रवासी हवालदिल : अनेक विमाने अर्धा ते पाऊण तास धावपट्टीवर रखडली

मुंबई : मुंबईहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात दोन तासांहून अधिक वेळ प्रवासी अडकल्याचे समोर आले आहे. इंडिगोच्या ६ ई ६०९७ या विमानाचे दुपारी ३.१५ ला उड्डाण अपेक्षित होते. त्यासाठी तासभर अगोदर प्रवाशांना विमानात बसविण्यात आले; मात्र या विमानाचे उड्डाण होण्यास प्रत्यक्षात रात्रीचे १० वाजले. या कालावधीत तब्बल ८ तास विमान धावपट्टीवर उभे ठेवण्यात आल्याने प्रवाशांच्या सहनशीलतेचा अंत झाला. या प्रदीर्घ कालावधीत प्रवाशांच्या खाण्यापिण्याची कोणतीही सोय संबंधित कंपनीकडून करण्यात आली नाही. त्यामुळे प्रवाशांनी कंपनीचा तीव्र निषेध केला.

विमानातील एक प्रवासी बेशुद्ध पडल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. विमानातील लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांसह इतर सर्व प्रवाशांची या कालावधीत आबाळ झाली. धावपट्टीवर विमान उभे करून प्रवाशांना त्यामध्ये बसवून ठेवण्यात आले होते. विमानाचा वैमानिक व काही केबिन क्रू वेळेत विमानतळावर पोहोचू शकले नसल्याची माहिती देण्यात आल्याचे प्रवाशांनी सांगितले. दुसºया घटनेत इंडिगोच्या ६ ई ५६६ या बेंगळुरू येथून मुंबईत आलेल्या विमानाचे लँडिंग झाल्यानंतर विमानातून प्रवाशांना खाली उतरण्यासाठी ग्राऊंड स्टाफ उपलब्ध नसल्याने प्रवाशांना अर्धा ते पाऊण तास विमानात ताटकळत राहावे लागले. तर जयपूर येथून मुंबईत आलेल्या विमानाचे लँडिंग झाल्यानंतर त्या विमानातील प्रवाशांनादेखील कर्मचारी नसल्याने विमानात ताटकळत राहावे लागले. विमानात तैनात कर्मचारी वेळेवर विमानतळावर पोहोचू शकले नसल्याने विमानाला विलंब झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र संबंधित विमानाने प्रवास करणारे सर्व प्रवासी वेळेत विमानतळावर पोहोचलेले असताना कर्मचारी कसे पोहोचू शकले नाहीत, असा प्रश्न प्रवाशांमधून विचारला जात आहे. मुंबई विमानतळाच्या धावपट्टीवर उड्डाणासाठी विमानांची रांग लागली होती व अनेक विमानांना सुमारे अर्धा ते पाऊण तास धावपट्टीवर खोळंबून राहावे लागल्याची तक्रार प्रवाशांनी केली आहे. 

टॅग्स :मुंबईपाऊस