इंडिगो विमानातून ६ किलो सोने जप्त

By Admin | Updated: February 20, 2015 01:39 IST2015-02-20T01:39:35+5:302015-02-20T01:39:35+5:30

विमानातील वॉशबेसिनच्या मागे कप्पा करून त्यात दडविलेले तब्बल सहा किलो सोने कस्टमच्या एअर इंटेलीजन्स युनिटने पकडले.

Indigo air seizures 6 kg gold | इंडिगो विमानातून ६ किलो सोने जप्त

इंडिगो विमानातून ६ किलो सोने जप्त

कस्टमची कारवाई : पहिल्यांदाच विमानात दडवून तस्करीचा प्रकार उघड
मुंबई : विमानातील वॉशबेसिनच्या मागे कप्पा करून त्यात दडविलेले तब्बल सहा किलो सोने कस्टमच्या एअर इंटेलीजन्स युनिटने पकडले. काल रात्री १०च्या सुमारास मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून मस्कतसाठी उड्डाण घेण्याच्या तयारीत असलेल्या इंडिगो कंपनीच्या विमानात ही कारवाई करण्यात आली.
आजवर तस्करांच्या आंतरराष्ट्रीय टोळ्या भारतात येणाऱ्या प्रवाशांना लक्ष्य करीत. कमिशनचे आमिष दाखवून त्यांच्या सामानातून सोने भारतात आणले जाई. मात्र चक्क विमानात सोने दडवून आणण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे एआययूकडून सांगण्यात आले.
इंडिगो कंपनीचे संबंधित विमान दुबईहून कालिकतला आले. त्यानंतर ते मुंबई, दिल्ली, कोलकाता असा प्रवास करून पुन्हा मुंबई विमानतळावर उतरले आणि येथून ते मस्कतला जाण्याच्या तयारीत होते. या विमानात मोठ्या प्रमाणावर सोने दडविण्यात आले आहे, ते भारतातल्या कोणत्याही विमानतळावर उतरवून घेतले जाईल, अशी माहिती कस्टमला मिळाली होती. त्यामुळे देशभरातील कस्टमचे सर्वच विभाग सतर्क होते. मात्र विमान जेव्हा पुन्हा मुंबई विमानतळावर उतरले तेव्हा येथील एआययू युनिटने अवघ्या काही मिनिटांत कानाकोपरा धुंडाळला. त्यात विमानातील तीन शौचालयांमधील वॉशबेसिनच्या मागे कप्पे करण्यात आल्याचे आढळले. त्यातून सुमारे दीड कोटी रुपयांचे सहा किलो सोने हस्तगत करण्यात आले.
एआययूच्या अंदाजानुसार, दुबई ते कालिकत दरम्यानच्या प्रवासात हे कप्पे तयार करण्यात आले, त्यात सोने दडविण्यात आले. मात्र भारतात आल्यावर कालिकतसह मुंबई, दिल्ली, कोलकाता विमानतळांवर ते उतरवून घेणे तस्करांना शक्य झाले नसावे.
विमानातील क्रूसह प्रवाशांवर संशयाची सुई आहे, असे एआययूच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला सांगितले. या विमानावरील क्रू आणि प्रवाशांची माहिती कंपनीकडून मागविण्यात आली आहे.
आम्ही सर्वच दृष्टिकोनातून तपास करीत आहोत. भारतात कोणत्या विमानतळावर हे सोने उतरवून घेतले जाणार होते, कोण ते उतरविणार होते याचाही शोध सुरू आहे, असे एआययूचे अपर आयुक्त मिलिंद लांजेवार यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

च्इंडिगो विमानातून होऊ घातलेली तस्करी पकडण्यासोबतच एआययूने गेल्या दोन दिवसांत वेगवेगळ्या तीन कारवाया केल्या आणि
२ किलो सोने हस्तगत केले.
च्अब्दुल रेहमान अब्दुल गफार या प्रवाशाने सॉक्समध्ये दडवलेले ७०० ग्रॅम वजनाचे व १७ लाख २५ हजार किमतीचे सोने हस्तगत करण्यात आले. दुबईहून मुंबईत उतरलेल्या अब्दुलला अटक केली आहे.
च् दुसऱ्या कारवाईत रियाधहून मुंबईला आलेल्या मुनीर न्हेराल्ट या प्रवाशाने सिगारेट पाकिटात दडविलेले ३५० ग्रॅम सोने हस्तगत करण्यात आले. तर शहाजहान बेगम बशीर खान या महिलेकडून ८१२ ग्रॅम सोने हस्तगत करण्यात आले.

Web Title: Indigo air seizures 6 kg gold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.