माहितीपटावर बंदी ही तर भारताची आत्महत्या; लेस्लींचे मत
By Admin | Updated: March 8, 2015 23:03 IST2015-03-08T23:03:49+5:302015-03-08T23:03:49+5:30
दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणावरील वृत्तपटावर भारत सरकारने बंदी घालून आंतरराष्ट्रीय पातळीवर आत्महत्या केली असल्याची

माहितीपटावर बंदी ही तर भारताची आत्महत्या; लेस्लींचे मत
लंडन : दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणावरील वृत्तपटावर भारत सरकारने बंदी घालून आंतरराष्ट्रीय पातळीवर आत्महत्या केली असल्याची प्रतिक्रिया या वृत्तपटाच्या दिग्दर्शिका लेस्ली उडविन यांनी व्यक्त केली.
‘इंडियाज डॉटर’ या नावाच्या या वृत्तपटाची निर्मिती करून भारताला कृतज्ञतेची भेट देण्याच्या माझ्या हेतूचा मी जणू काही भारताला दोष देत आहे, असा चुकीचा अर्थ लावला गेला, असे उडविन म्हणाल्या.
त्या म्हणाल्या की, ‘माझा सगळा हेतू हा भारताचे कौतुक करण्याचा व कृतज्ञतेची भेट देण्याचा होता. कारण त्या बलात्काराच्या घटनेत भारताचा प्रतिसाद हा खरोखर अनुकरणीय होता व एक देश म्हणून तेथे काही बदलही आपल्याला बघायला मिळाले आहेत. मोठ्या दुर्दैवाची बाब अशी की, मी त्यांना त्याबद्दल दोष देत असल्याचे, भारताची बदनामी करीत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. वास्तविक या वृत्तपटावर बंदी घालून भारताने आंतरराष्ट्रीय आत्महत्याच केली आहे.’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या ‘बेटी बचाव’ मोहिमेचे प्रतिबिंबच त्यांना या वृत्तपटात बघायला मिळेल, असे लेस्ली उद््विन ‘डॉटर आॅफ इंडिया’चे प्रदर्शन झाल्यानंतर बोलत होत्या. माहितीपटाचे बीबीसीवर प्रक्षेपण झाल्यावर भारताने आक्षेप घेऊन त्याचे प्रसारण थांबविण्यास सांगितले होते व यू ट्यूबवरून त्याच्या लिंकस् काढून टाकण्यास सांगितले होते. मोदी यांनी स्वत: तासभराचा हा वृत्तपट बघितला तर ते सत्तेत आल्यापासून त्यांनी केलेली विधानेच त्यांना त्यात बघायला मिळतील, असाही दावा लेस्ली यांनी केला. ‘इंडियाज डॉटर’ इंग्लंडमध्ये बीबीसीच्या आयप्लेयरवर आॅनलाईन उपलब्ध आहे. निर्भयावर बलात्कार करणाऱ्या पाच आरोपींपैकी मुकेश सिंह याची मुलाखत त्यात आहे. तीत त्याने जे विधान केले आहे त्यावरून समाजात भीती आणि दहशत निर्माण होऊन लोकांमध्ये चीड निर्माण होईल. ही जोखीम नको म्हणून भारत सरकारने या वृत्तपटावर बंदी घातली आहे.