भारताचा अतींद्रिय विज्ञान क्षेत्राविषयी पुढाकार गरजेचा
By Admin | Updated: January 10, 2017 05:24 IST2017-01-10T05:24:53+5:302017-01-10T05:24:53+5:30
परदेशात विशेषत: युरोप राष्ट्रांमध्ये अतींद्रिय या विषयावरील अभ्यासासाठी विशेष विभाग तयार करण्यात येतात, तसेच त्याच्यावर चर्चा होत असते

भारताचा अतींद्रिय विज्ञान क्षेत्राविषयी पुढाकार गरजेचा
मुंबई : परदेशात विशेषत: युरोप राष्ट्रांमध्ये अतींद्रिय या विषयावरील अभ्यासासाठी विशेष विभाग तयार करण्यात येतात, तसेच त्याच्यावर चर्चा होत असते. त्यामुळे या विषयाचे कुतूहल अधिक खोलात जाऊन शोधले पाहिजे. भारतातदेखील याबाबत पुढाकार घेण्याची गरज आहे, असे मत सी. एन. बढे यांनी व्यक्त केले.
अतींद्रिय विज्ञानाच्या अभ्यासक डॉ. मेहरा श्रीखंडे यांना स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने सोमवारी सन्मानित करण्यात आले. त्यांच्या या विषयावरील संशोधनाबद्दल, तसेच शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करण्यासाठी संशोधकांना प्रोत्साहित करण्याच्या कार्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला. या वेळी कार्यवाह राजेंद्र वराडकर उपस्थित होते. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी सातत्याने आधुनिकता आणि विज्ञानवादाचा पुरस्कार केला आहे. नवनवीन संशोधन व्हावे आणि मानवतेच्या कल्याणार्थ
कार्य व्हावे, अशी त्यांची इच्छा असायची. त्यामुळेच अतींद्रिय विज्ञानाविषयी असलेले कुतूहल शमविण्यासाठी शास्त्रीय पद्धतीने त्याचा अभ्यास अधिकाधिक व्यापक प्रमाणावर व्हायला हवा, असे मत कार्यवाह राजेंद्र वराडकर यांनी व्यक्त केले.
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने मिळालेला पुरस्कार, यापुढील कार्यात निश्चितपणे एक प्रेरणा ठरणार आहे. भारतातील अनेक दाखले व घटना या अतींद्रिय अभ्यासासाठी खुणावत आहेत, त्यातील ज्ञान हे
लवकरच जगापुढे आपण आणू शकू, असा विश्वास डॉ. मेहरा श्रीखंडे यांनी या वेळी व्यक्त केला. डॉ. मेहरा यांना जिजाबाई व सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी वाघिणी पुरस्कारदेखील मिळाला आहे. (प्रतिनिधी)