Join us
Daily Top 2Weekly Top 5

सायकलवरून दिला प्रदूषणमुक्त भारताचा संदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2019 05:26 IST

प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस बिकट होत आहे. परिणामी, यातून मार्ग काढण्यासाठी प्रत्येक स्तरातून प्रयत्न केला जात आहे.

मुंबई : प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस बिकट होत आहे. परिणामी, यातून मार्ग काढण्यासाठी प्रत्येक स्तरातून प्रयत्न केला जात आहे. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून ‘प्रदूषणमुक्त भारत’ हा संदेश देण्यासाठी सोपान नलावडे, विकास भोर, नामदेव नलावडे, दीपक निचित, लक्ष्मण जगताप, अभिजित गुंजाळ, सतीश जाधव या सात जणांनी मुंबई-पुणे-कन्याकुमारी असा १ हजार ७०० किमी सायकल प्रवास करत आदर्श घालून दिला आहे.मुंबई, पुण्यातील या सात सायकलस्वारांनी २५ आॅक्टोबर रोजी आपला प्रवास मुंबईतून सुरू केला आणि ४ नोव्हेंबर रोजी कन्याकुमारी येथे तो पूर्ण केला. ४ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता ते सायकलवरून कन्याकुमारीत दाखल झाले. ११ दिवसांच्या या प्रवासातील अतिमहत्त्वाचा क्षण म्हणजे तामिळनाडू शासनाच्या ‘पर्यावरण मंत्रालय व वन मंत्रालया’ने या सायकल वारीतून देण्यात येणाऱ्या संदेशाची अतिशय सकारात्मक दखल घेतली, असे या सायकलस्वारांनी सांगितले. या दोन्ही मंत्रालयांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण मंत्रालयाशीदेखील त्यांनी संपर्क साधला. ११ दिवसांचा प्रवास करताना त्यांना अनेक अनुभव आले. कर्नाटक वरिष्ठ पोलीस अधिकाºयाने सायकल प्रवेश नसलेल्या चांगल्या पण खासगी रस्त्याने प्रवेश दिला. स्वत: वाहनांसह ५० किमी अंतर या ग्रुपबरोबर प्रवास केला.>‘अनेक माणसे भेटली; बरेच अनुभव मिळाले’प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाहने हीदेखील या प्रदूषणात भर घालतात. त्यामुळेच सायकलचा वापर करीत प्रदूषणमुक्तीचा संदेश देशाला देण्याचा ध्यास घेतला तो मुंबई, पुण्यातील सात जणांनी आणि सुरू झाला मुंबई-पुणे-कन्याकुमारी असा प्रवास. एके दिवशी तीन तास मुसळधार पाऊस असतानाही हा प्रवास सुरूच राहिला. काही वेळा सायकलने त्रासही दिला. पण दमायचे नाही, थांबायचे नाही, अशी मनाशी पक्की खूणगाठ बांधून तब्बल १ हजार ७०० किमी सायकल प्रवास त्यांनी ११ दिवसांत पूर्ण केला. या प्रवासात अनेक माणसे भेटली. बरेच अनुभव गाठीशी आले. सायकलने प्रवास करून प्रदूषणमुक्तीचा संदेश प्रवासात भेटलेल्या अनेकांना देणे हेच आमच्यासाठी सर्वांत महत्त्वाचे होते, असे या सायकलस्वारांनी सांगितले.>आजोबांकडून मिळालेखाऊसाठी बक्षीसप्रदूषणमुक्त भारताचा संदेश देण्यासाठी सायकलवरून निघालेल्या या सात जणांपैकी एक असलेल्या सोपानला या प्रवासात एका ८० वर्षांच्या आजोबांनी कौतुकाने २० रुपये खाऊसाठी बक्षीस दिले. धारवाड कृषी विद्यापीठ येथील एका प्राध्यापकांनी स्वत:हून राहण्याची, जेवणाची सोय करून दिली, असे सायकलस्वारांनी सांगितले.