- महेश कोले, मुंबई चेन्नईतील पेरांबूर येथील ‘इंटीग्रल कोच फॅक्टरी’मध्ये तयार करण्यात आलेली देशातील पहिली ‘नॉन-एसी’ बंद दरवाजांची लोकल ट्रेन मुंबईकडे रवाना झाली असून, लवकरच ती उपनगरीय सेवेत दाखल होणार आहे. २६८२०१–२६८२१२ क्रमांक असलेली १२ डब्यांची ही अत्याधुनिक गाडी स्वयंचलित सरकत्या दरवाजांनी सुसज्ज आहे. ही लोकल शुक्रवार किंवा शनिवारपर्यंत मुंबईत दाखल होणार आहे.
मुंबईच्या उपनगरीय रेल्वे इतिहासातील हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. विशेष म्हणजे, ही भारतातील पहिलीच नॉन-एसी लोकल गाडी आहे ज्यामध्ये ‘ऑटोमॅटिक स्लायडिंग डोअर्स’ प्रणाली बसवण्यात आली आहे.
गर्दीच्या वेळेत दरवाज्यांवर लटकून प्रवास करण्याच्या धोकादायक प्रकारांना आळा घालण्यासाठी हा प्रयोग महत्त्वाचा ठरणार आहे. सध्या ही रेक ‘रिकामी विशेष लोकल’ म्हणून रेणिगुंटा मार्गे मुंबईकडे आणली जात आहे.
मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील स्थानकावर या गाडीचा अधिकृत स्वीकार केला जाणार आहे. त्यानंतर पुढील तांत्रिक तपासणीसाठी आणि सेवेत दाखल करण्यासाठी ही गाडी कुर्ला कारशेडमध्ये नेण्यात येईल.
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सप्टेंबर २०२५ मध्ये मुंबईतील लोकल गाड्यांमध्ये बंद दरवाजांची प्रणाली टप्प्याटप्प्याने लागू करण्याची घोषणा केली होती. “प्रवाशांच्या सुरक्षेसाठी लोकल गाड्यांचे दरवाजे बंद असणे अत्यंत आवश्यक आहे.
यापुढे मुंबईसाठी तयार होणाऱ्या सर्व गाड्या बंद दरवाजांच्या असतील,” असे त्यांनी स्पष्ट केले होते. या पार्श्वभूमीवर ही नवीन गाडी ‘पथदर्शी प्रकल्प’ ठरणार असून, भविष्यात मुंबईतील उपनगरीय सेवेत मोठा बदल घडवून आणण्याची शक्यता आहे.
Web Summary : Mumbai is set to receive India's first non-AC local train with automatic sliding doors. This 12-car train aims to reduce dangerous overcrowding and will undergo testing before deployment. Railway Minister announced phased implementation of closed-door systems for enhanced passenger safety.
Web Summary : मुंबई को स्वचालित स्लाइडिंग दरवाजों वाली भारत की पहली नॉन-एसी लोकल ट्रेन मिलने वाली है। इस 12-डिब्बे वाली ट्रेन का उद्देश्य खतरनाक भीड़भाड़ को कम करना है और तैनाती से पहले इसका परीक्षण किया जाएगा। रेल मंत्री ने यात्रियों की सुरक्षा के लिए बंद दरवाजे प्रणालियों के चरणबद्ध कार्यान्वयन की घोषणा की।