Join us  

मुंबईकर आरोहीची शानदार कामगिरी; अटलांटिक महासागर पार करत विक्रमाला गवसणी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2019 12:06 PM

महिलांनी सर्वच क्षेत्रात उंच भरारी घेतली आहे. मुंबईच्या कॅप्टन आरोही पंडितने इतिहास रचला आहे. आरोहीने लाईट स्पोर्ट एअरक्राफ्टच्या सहाय्याने अटलांटिक महासागर पार केला आहे.

ठळक मुद्देमुंबईच्या कॅप्टन आरोही पंडितने इतिहास रचला आहे. आरोहीने लाईट स्पोर्ट एअरक्राफ्टच्या सहाय्याने अटलांटिक महासागर पार केला आहे. अटलांटिक महासागर पार करणारी ती जगातील पहिली महिला ठरली आहे.

मुंबई - महिलांनी सर्वच क्षेत्रात उंच भरारी घेतली आहे. मुंबईच्या 23 वर्षीय आरोही पंडितने इतिहास रचला आहे. आरोहीने लाईट स्पोर्ट एअरक्राफ्टच्या सहाय्याने अटलांटिक महासागर पार केला आहे. अटलांटिक महासागर पार करणारी ती जगातील पहिली महिला ठरली आहे. मिनी बसच्या लांबीएवढ्या 'माही' या छोटेखानी विमानातून 3000 किमीची हवाईयात्रा तिने यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. 

बॉम्बे फ्लाइंग क्लबमध्ये वैमानिकाचे प्रशिक्षण घेतलेल्या आरोही पंडितने लाईट स्पोर्ट एअरक्राफ्टच्या सहाय्याने युकेतील स्कॉटलँड येथून उड्डाण केले. या हवाई यात्रेदरम्यान ती आईसलँड आणि ग्रीनलँड या दोन ठिकाणी थांबली होती.  परिस्थितीचा सामना करत तिने 'माही' या लाईट स्पोर्ट एअरकाफ्टमधून तीन हजार किमीची हवाईयात्रा पूर्ण केली. त्यानंतर तिने कॅनडातील इकालुइट विमानतळावर लँडिंग केले. आरोही 90 दिवसांत 23 देशांना भेट देणार आहे.

'मी देशीची आभारी आहे. अटलांटीक महासागर पार करण्याचा अनुभव विलक्षण होता. खाली बर्फाप्रमाणे भासणारा समुद्र, वर निळे आकाश, मी आणि छोटं विमान' अशा शब्दात आरोहीने तिच्या हवाई यात्रेचं वर्णन केले आहे. तसेच जगातील कोणतीही महिला अटलांटिक महासागर विमानाच्या सहाय्याने पार करू शकते, फक्त त्यासाठी जिद्द हवी असं म्हणत आरोहीने सर्व महिलांना प्रोत्साहित केलं आहे.

भारताच्या महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या सहकार्याने ‘महिला सशक्ती अभिनयानांतर्गत, We Women Empower Expedition ही मोहीम आखण्यात आली आहे. केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालयाकडून या मोहिमेला प्रोत्साहन मिळाले आहे. या मोहिमेंतर्गत तीन टप्प्यांत संपूर्ण जगभर या एअरक्राफ्टने प्रवास करत ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’चा संदेश दिला जाणार आहे. आरोहीने हा विश्वविक्रम या मोहिमेअंतर्गत केला आहे. 

आरोहीने याआधी मोहिमेबाबत मोठी उत्सुकता असल्याची भावना व्यक्त केली होती. आमचा आदर्श घेऊन देशातील शेकडो तरुणी नागरी हवाई वाहतुकीच्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी पुढे येतील, असा विश्वास देखील तिने व्यक्त केला होता. महिला अधिकाऱ्यांनी आयएनएसव्ही तारिणीद्वारे समुद्रामार्गे केलेल्या विश्वभ्रमंतीमधून प्रेरणा मिळाल्याचे आरोहीने सांगितले होते. मुंबईकर आरोहीच्या शानदार कामगिरीनंतर तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. 

 

टॅग्स :मुंबईभारत