यकृतातील मेदवाढीच्या विळख्यात भारतीय

By Admin | Updated: April 19, 2015 01:48 IST2015-04-19T01:48:48+5:302015-04-19T01:48:48+5:30

बदलत्या जीवनशैलीमुळे भारतीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे. भारतीयांमध्ये लठ्ठपणा वाढल्याने मधुमेह, हृदयविकार, सांधेदुखीसारखे आजार त्यांना जडत आहेत.

Indians in the history of liver liver | यकृतातील मेदवाढीच्या विळख्यात भारतीय

यकृतातील मेदवाढीच्या विळख्यात भारतीय

मुंबई : बदलत्या जीवनशैलीमुळे भारतीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे. भारतीयांमध्ये लठ्ठपणा वाढल्याने मधुमेह, हृदयविकार, सांधेदुखीसारखे आजार त्यांना जडत आहेत. त्याचबरोबरीने यकृताचे आजार बळावत आहे. १०पैकी ३ ते ४ भारतीयांना यकृतातील मेदाचा (फॅटी लिव्हरचा) त्रास जडलेला आहे. वेळीच लक्ष दिल्यास हा आजार टाळता येऊ शकतो. पण, निदान झाले नसल्यामुळे याची जाणीव अनेकांना नसल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांचे मत आहे.
कामाचा ताण, अवेळी खाणे - पिणे, एकाच ठिकाणी बसून काम करणे, आर्थिक अडचणी, मानसिक ताण या सगळ्यांचा परिणाम म्हणजे वाढत जाणारा लठ्ठपणा. लठ्ठपणा वाढल्याने शरीरातील मेदाचे प्रमाण वाढते. यकृतातील मेदाचेही प्रमाण वाढल्याने कार्यक्षमता कमी होत जाते. १०० मुंबईकरांपैकी २० ते ४० जणांना यकृतातील मेद वाढीचा आजार जडलेला आहे. वेळीच उपचार केल्यास आजार बरा होऊ शकतो.
प्राथमिक अवस्थेत यकृताच्या आजाराची कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत. त्यामुळे आजार शेवटच्या पातळीवर गेल्यावरच त्याचे निदान होते. वेळीच निदान झाल्यास यकृतातील मेद कमी करून पुढे संभवणारा धोका टाळता येऊ शकतो. यकृतातील मेद वाढल्यामुळे ५० टक्के जणांमध्ये यकृताचे इतर आजार जडतात. त्यामुळे त्यांना प्रत्यारोपणाची आवश्यकता भासते, असे ग्लोबल रुग्णालयाचे यकृतविकार विभागाचे प्रमुख डॉ. समीर शहा यांनी सांगितले.
पुढच्या काही वर्षांत यकृतातील वाढलेला मेद ही आरोग्य क्षेत्रातील मोठी समस्या बनणार आहे. प्रत्येक तिसरी व्यक्ती लठ्ठपणाचा शिकार होताना दिसत आहे. पुढच्या काही वर्षांत हे चित्र असेच राहिल्यास यकृताचे आजार वाढतील. प्राथमिक अवस्थेत यकृताच्या आजाराची लक्षणे दिसून येत नसल्यामुळे तपासणी करणे हा एकच पर्याय आहे.
यकृताचा आजार वाढल्यास पोटात पाणी होणे, अंतर्गत रक्तस्राव होणे अशी गुंतागुंत निर्माण होऊ शकते. लठ्ठपणा कमी करण्यासाठी व्यायाम करणे, मधुमेह असल्यास योग्य उपचार घेणे या गोष्टी पाळणे अत्यंत गरजेचे असल्याचे जसलोक रुग्णालयाचे संचालक डॉ. चंदेर लुल्ला यांनी सांगितले.
(प्रतिनिधी)

 

Web Title: Indians in the history of liver liver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.