भारतीय शास्त्रज्ञाचे कॅन्सरवरील संशोधन जगात भारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:26 IST2021-02-05T04:26:53+5:302021-02-05T04:26:53+5:30
प्रथम क्रमांकाचा बहुमान : ‘ब्राईट साईड ऑफ २०२०’ पुरस्काराने हाेणार सन्मान * ३१ संशाेधन व ३१ नानासाहेब थाेरात असे ...

भारतीय शास्त्रज्ञाचे कॅन्सरवरील संशोधन जगात भारी
प्रथम क्रमांकाचा बहुमान : ‘ब्राईट साईड ऑफ २०२०’ पुरस्काराने हाेणार सन्मान
* ३१ संशाेधन व ३१ नानासाहेब थाेरात असे दाेन फाेटाे सीडी व फाेटाेडेस्कला मेल केले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : नॅनो टेक्नॉलॉजी, आयुर्वेद आणि लेसर अभियांत्रिकी तंत्रज्ञान एकत्रित करून कर्करोग आणि संसर्गजन्य रोग या दोन्ही आजारांवर एकाच प्रभावी उपचार पद्धतीचे संशोधन करणारे भारतीय शास्त्रज्ञ डॉ. नानासाहेब थोरात यांच्या संशोधनाला युरोपियन युनियन कमिशनने ‘ब्राईट साईड ऑफ २०२०’ हा सर्वोत्कृष्ट संशोधनाचा प्रथम क्रमांकाचा बहुमान देऊन गाैरविले. डिसेंबर २०२० अखेर या पुरस्कारांची घोषणा झाली. येत्या १८ मार्च रोजी पुरस्काराचे ऑनलाईन वितरण हाेईल.
युरोपियन युनियन या युरोपमधील २८ देशांचा समूह आणि युरोपियन कमिशनने २०२० मध्ये मानवी जीवन सुखकर करणारे संशोधन आणि वैज्ञानिक क्षेत्रातील १० सर्वोत्कृष्ट संशोधन प्रकल्प जाहीर केले. त्यात प्रथम क्रमांकाचा मान डॉ. थोरात यांच्या संशोधनास मिळाला. मूळचे सातारा जिल्ह्यातील मायणी येथील डॉ. थोरात इंग्लंड येथे ऑक्सफर्ड विद्यापीठात वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी सहकाऱ्यांसह २०१६ ते २०२० या चार वर्षांत युरोपियन कमिशनच्या अर्थसाहाय्याने ‘नॅनोकार्गो’ हा संशोधन प्रकल्प राबविला.
‘नॅनोकार्गो’ संशोधन प्रकल्पात नॅनो टेक्नॉलॉजी, आयुर्वेद व लेसर अभियांत्रिकी तंत्रज्ञान एकत्र करून दोन्ही आजारांवर एकच प्रभावी उपचार पद्धती शोधण्यात आली आहे. या उपचार पद्धतीमुळे कर्करोगाची गाठ (ट्यूमर) केवळ ३० मिनिटांत निष्क्रिय होत असल्याचे थोरात यांनी सांगितले.
* अशी आहे उपचारपद्धती
- चुंबकीय गुणधर्म असणारे गोल्ड नॅनो पार्टिकल्स आणि त्यावर अँटिकॅन्सर आणि ॲटिबॅक्टेरियल गुणधर्म असणारा आयुर्वेदिक पदार्थ कुरक्युमिन (हळद) यांचे संयुग तयार करण्यात आले. हे नॅनो संयुग चुंबकीय ऊर्जा आणि लेसर किरणांच्या साहाय्याने सक्रिय करून कर्करोगाची गाठ (ट्यूमर) आणि प्रतिजैविकाला विरोध करणारे बॅक्टेरिया या दोघांनाही ३० मिनिटांपेक्षा कमी वेळेत १०० टक्के निष्क्रिय करण्यात येते.
- या तंत्रज्ञानाचे वैशिष्ट्य म्हणजे चुंबकीय ऊर्जा वापरून हे नॅनो संयुग शरीरात गाठ असलेल्या ठिकाणी कोणत्याही अडथळ्याशिवाय पाेहाेचते. स्वित्झर्लंडमधील प्राण्यांच्या प्रयोगशाळेत या तंत्रज्ञानाच्या यशस्वी चाचण्या झाल्या असून, हे संशोधन, तंत्रज्ञान फक्त प्रयोगशाळेत न राहता लवकरात लवकर मानवी उपचारपद्धतीत वापरण्यात येईल.
* भारतीय कंपनी नियामक मंडळाकडे करणार नोंदणी
या तंत्रज्ञानाचा फायदा भारतीयांना व्हावा यासाठी युरोपियन कमिशनसाेबत तंत्रज्ञान हस्तांतरण करून भारतात स्टार्टअप कंपनी स्थापन करण्यासाठी मान्यता मिळविली आहे. लवकरच भारतीय कंपनी नियामक मंडळाकडे नोंदणी करून हे तंत्रज्ञान भारतीय हेल्थ मार्केटमध्ये आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
- डॉ. नानासाहेब थोरात,
वरिष्ठ संशोधक, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी
.....................................