Join us

ऑलिम्पियाडमध्ये भारताला चार पदके; जळगावचा देवेश आणि हैदराबादच्या संदीपला सुवर्ण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 07:03 IST

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : दुबई येथे झालेल्या ५७ व्या आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारतीय विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करीत दोन ...

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : दुबई येथे झालेल्या ५७ व्या आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारतीय विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करीत दोन सुवर्ण आणि दोन रौप्यपदके पटकाविली. त्यामध्ये जळगावच्या देवेश पंकज भैया आणि हैदराबादच्या संदीप कुची यांनी सुवर्णपदकांची कमाई केली, तर ओडिशातील भुवनेश्वर येथील देबदत प्रियदर्शी आणि दिल्लीच्या उज्ज्वल केसरी यांनी रौपपदकांची कमाई केली. 

दुबई येथील आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये यंदा २० देशांमधील ३५४ विद्यार्थी सहभागी झाले होते. यंदाच्या या स्पर्धेत भारत सहाव्या स्थानावर होता. रसायनशास्त्रातील ऑलिम्पियाडमध्ये सहभागी होण्याचे भारताचे हे २६ वर्ष आहे.  

आतापर्यंत ३० टक्के भारतीय विद्यार्थ्यांनी सुवर्ण, ५३ टक्के विद्यार्थ्यांनी रौप्य आणि १७ टक्के विद्यार्थ्यांनी कांस्यपदके जिंकली. स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या विद्यार्थ्यांची निवड आणि प्रशिक्षण होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशनतर्फे दिले जाते.

देवेश याला लहानपणापासून विज्ञान विषयाची आवड आहे. त्यातून त्याने अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरचे पुरस्कार मिळविले आहेत. तसेच त्याचे हे चौथे सुवर्णपदक आहे. त्याच्या यशामुळे आम्हाला खूप आनंद झाला. - पल्लवी भैया, देवेशची आई