अबॅकस स्पर्धेत भारत तिसऱ्या क्रमांकावर
By Admin | Updated: January 3, 2017 06:08 IST2017-01-03T06:08:02+5:302017-01-03T06:08:02+5:30
गणित विषय म्हटले की अनेक मुलांना भीती वाटते. गणिताचा पेपर म्हटले की विद्यार्थ्यांना नकोसा होतो. पण देशातील २१ मुलांनी आंतरराष्ट्रीय अॅबॅकस स्पर्धेत १ मिनिटात १०० गणिते सोडवून तिसरा

अबॅकस स्पर्धेत भारत तिसऱ्या क्रमांकावर
मुंबई : गणित विषय म्हटले की अनेक मुलांना भीती वाटते. गणिताचा पेपर म्हटले की विद्यार्थ्यांना नकोसा होतो. पण देशातील २१ मुलांनी आंतरराष्ट्रीय अॅबॅकस स्पर्धेत १ मिनिटात १०० गणिते सोडवून तिसरा क्रमांक पटकावला आहे.
वेगवान आकडेमोड करून गणिते सोडवण्याच्या पद्धतीला अॅबॅकस असे म्हणतात. चार, पाच आकडी गणिते सोडवताना अनेकांना कॅल्क्युलेटर, पेन लागते. पण अॅबॅकस पद्धतीत याची आवश्यकता नसते. अॅबॅकसच्या पुढच्या पायऱ्यांवर गेल्यावर मुले स्वत: फक्त विचार करून गणिते सोडवतात. सेडल साऊथ कोरिया येथे झालेल्या १६ व्या आंतरराष्ट्रीय अॅबॅकस स्पर्धेत २० देशांतील हजारो विद्यार्थी सहभागी झाले होते. देशातून २१ जणांची चमू या स्पर्धेत सहभागी झाली होती. या स्पर्धेत वेगवान वेळात गणिते सोडवून ११ मुलांनी यश मिळवले आहे. त्यामुळे देशाने या स्पर्धेत तिसरा क्रमांक पटकाविला आहे.
मुंबई, नवी मुंबई, रायगड आणि पुणे येथून या स्पर्धेसाठी मुलांची निवड करण्यात आली होती. सर्वसाधारणपणे देशातील मुलांनी १ मिनिटात १०० तर काही विद्यार्थ्यांनी ८० गणिते सोडवली आहेत. मधुरा भोईटे, जुई काळे, अनुप्रीत कौर कबीर सिंग सागो, गोपाल पाटील, आयुष पाटील, उदयराज दगडे, यश ठाकूर, साई कळमकर, ललित माने, कौस्तुभ कदम या मुलांना परीक्षेत यश मिळाले आहे. (प्रतिनिधी)