लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अमेरिका, युरोप, जपान अशा महाकाय अर्थसत्ता असलेल्या देशांवर आज मंदीचे सावट आहेत. अशा स्थितीतही अलीकडेच झालेल्या दावोस परिषदेत मात्र भारतीय अर्थव्यवस्था किती सशक्त आहे आणि किती दमदार कामगिरी करत आहे, यावर चर्चा झाली. ही अतिशय अभिमानाची गोष्ट असल्याचे मत केंद्रीय पर्यटन व सांस्कृतिक मंत्री गजेन्द्र सिंग शेखावत यांनी व्यक्त केले. वायफाय आणि सीयआयआय यांच्यावतीने मुंबईत दोन दिवस यंग इंडियन्स लार्जेस्ट कॉन्क्लेव्ह ऑन ऑन्थ्रोप्रीर्नशीप या विषयावरील परिषदेमध्ये ते बोलत होते.
तरुण उद्योजकांना संबोधताना ते म्हणाले की, गेल्या दशकभरात भारताने विकासाचा एक टप्पा पूर्ण केला आहे. २०४७ पर्यंत विकसित भारताचे जे स्वप्न पूर्ण करायचे आहे, त्यामध्ये तुमच्या पिढीचा वाटा हा अत्यंत महत्त्वाचा असेल. तुमच्या पुढच्या पिढीला विकसित भारतामध्ये नांदता येईल. मात्र, त्या पिढीला जे मिळणार आहे ते तुमच्यामुळे मिळणार आहे आणि त्याचा निश्चित अभिमान तुम्हाला असेल.
देशातील पर्यटन क्षेत्रात आगामी काळात असलेल्या संधींवरही पर्यटन मंत्री म्हणून शेखावत यांनी यावेळी विस्तृत भाष्य केले. आज पर्यटनाचे स्वरूप बदलले आहे. सांस्कृतिक, धार्मिक, परंपरा, तंत्रज्ञान, खाद्यसंबंधित अशा विविध अंगांनी लोकांना पर्यटन हवे आहे. आपल्याकडील बहुविविधता अशा सर्व प्रकारचे पर्यटन पुरवू शकते. त्यामुळे देशात येणाऱ्या परदेशी पर्यटकांची संख्या वाढत आहे. गेल्यावर्षी देशामध्ये एक कोटी परदेशी पर्यटक आल्याची माहितीही त्यांनी दिली.
संस्थेचे उपाध्यक्ष अरुण राठोड यांनी ही परिषद नेटवर्किंगचे एक उत्तम माध्यम असून, ग्रामीण आणि शहरी भागातील उद्योजकांना जोडणारा हा दुवा आहे, असे सांगितले. यंग इंडियन्सचे राष्ट्रीय अध्यक्ष तरंग खुराणा यांनी ही परिषद म्हणजे केवळ एक इव्हेंट नाही तर ही तरुण उद्योजकांची एक चळवळ असल्याचे मत व्यक्त केले. सीआयआयच्या पश्चिम विभागाचे अध्यक्ष ऋषी कुमार बागल म्हणाले की, अशा परिषदांमुळे विविध क्षेत्रांमधील उद्योजक अनेक संकल्पना घेऊन येतात. त्यांचे आदानप्रदान होते. यावर विचारमंथन येऊन संकल्पनेच्या पातळीवर असलेल्या अनेक गोष्टींना मूर्तरूप प्राप्त होण्यास मदत होते.