भारत मूर्खांचा देश
By Admin | Updated: December 19, 2015 11:25 IST2015-12-19T02:25:57+5:302015-12-19T11:25:30+5:30
वादग्रस्त विधान करण्यात आघाडीवर असलेले देशाचे माजी सरन्यायाधीश मार्कंडेय काटजू यांनी आयआयटीच्या ‘मूड इंडिगो’ महोत्सवाच्या उद्घाटनावेळीही धक्कादायक विधानांची परंपरा कायम राखली.

भारत मूर्खांचा देश
- दीपक कोळेकर, मुंबई
वादग्रस्त विधान करण्यात आघाडीवर असलेले देशाचे माजी सरन्यायाधीश मार्कंडेय काटजू यांनी आयआयटीच्या ‘मूड इंडिगो’ महोत्सवाच्या उद्घाटनावेळीही धक्कादायक विधानांची परंपरा कायम राखली. भारत हा मूर्खांचा देश असल्याच्या त्यांच्या पूर्वीच्याच वक्तव्याचा त्यांनी यावेळी पुनरुच्चार केला. तर भारतीयांना नेहमीच
कोणी तरी ‘सपनो का सौदागर’ हवा असतो, अशी कोपरखळीही त्यांनी मारली.
आयआयटी-मुंबई येथे ‘मूड इंडिगो’ महोत्सवाला आज धडाक्यात प्रारंभ झाला. देशभरातील
विद्यार्थी या महोत्सवात सहभागी झालेले आहेत. त्यामध्ये पहिल्या दिवशी विद्यार्थांनी माजी सरन्यायाधीश काटजू यांच्याशी विविध विषयांवर संवाद साधला.
या वेळेस बोलताना काटजू
म्हणाले, भारतीय चांगले आहेत, पण मेंदूचा वापर कमी करण्यात ते आघाडीवर आहेत.
भारतीय लोक शिक्षणासाठी
खूप पैसा खर्च करतात, पण त्याचा वापर देशासाठी न करता परदेशात दुय्यम पगारावर काम करणे ते पत्करतात, अशी टीका त्यांनी आयआयटीमधून बाहेर जाणाऱ्या विद्यार्थ्यांवर केली. नोकऱ्या उपलब्ध न होण्यास मात्र त्यांनी राजकारण्यांना जबाबदार धरले.
‘देश अजूनही मागासलेला’
आपला देश अजूनही मागासलेला आहे. भारतीय समाज अंधश्रद्धाळू असून जातिभेदात अडकलेला आहे. विकास म्हणजे केवळ नोकरी आणि अर्थार्जन नव्हे तर मानवविकासही त्यात अपेक्षित असतो.
त्यासाठी क्रांती होण्याची गरज आहे.
फ्रेंच आणि आणि रशियन क्रांतीतून भारतीयांनी धडे घेण्याची गरज असल्याचेही काटजू म्हणाले. मी मोकळ्या विचारांचा, लाजाळू स्वभावाचा आहे.
परंतु, तेवढाच बचावात्मक प्रतिवाद करण्यात पटाईत असल्याचे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. तथापि, देशाचा खरा विकास आणि देशहितासाठी खंबीर भूमिका वेळोवेळी घेऊ, असेही ते म्हणाले.
संसदेतील नेत्यांच्या वागणुकीवरही त्यांनी या वेळेस आक्षेप नोंदवला. संसदेत कुठलीही चर्चा होत नसल्याने गरिबांचे प्रश्न जैसे थे असल्याचे त्यांनी म्हटले. नेत्यांना केवळ निवडणुका आणि त्यानंतर त्यामागून मिळणारा पैसा हवा असल्याची कडवट टीका काटजू यांनी या वेळी केली. देशास लुटणे आणि जातीवाद जोपासणे हेच नेत्यांचे काम असल्याचेही ते म्हणाले.
‘सपनों के सौदागर’ : इंदिराच्या रूपात गरिबी हटावचे स्वप्न, मोदींचे फसवे विकास मॉडेल आणि केजरीवालांचे भ्रष्टाचार मुक्तीचे स्वप्न हे केवळ स्वप्नरंजन असल्याची टीका काटजू यांनी केली. भारतीय मानसिकतेला असेच कोणी तरी ‘सपनों के सौदागर’ नेहमीच लागतात. यामुळे भारतीय लोकशाही संकटात आल्याचेही ते म्हणाले. न्याय व्यवस्थेतही भ्रष्टाचार होत असून पंचायत न्याय व्यवस्था हे भ्रष्टाचाराचे केंद्र असल्याचे त्यांनी सांगितले.