‘भारत’ संचार निगमला वावडे ‘भारत’रत्नाच्या गावाचे ?

By Admin | Updated: September 9, 2014 23:48 IST2014-09-09T23:30:27+5:302014-09-09T23:48:41+5:30

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव आंबडवे येथे अजूनही दूरध्वनी सेवा पोहोचलेली नाही.

'India' communication corporation to Vavade 'Bharat' village? | ‘भारत’ संचार निगमला वावडे ‘भारत’रत्नाच्या गावाचे ?

‘भारत’ संचार निगमला वावडे ‘भारत’रत्नाच्या गावाचे ?

शिवाजी गोरे -दापोली --स्वातंत्र्याच्या ६० (साठी) नंतरही भारतरत्नांच्या गावात दूरध्वनी सुविधा पोहोचली नाही. इंटरनेटच्या सहायाने जग जवळ येऊ पाहात असताना जगाला समता, समानता, बंधूतेची शिकवण देणारे जागतिक कीर्तीचे बुध्दिवंत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव आंबडवे येथे अजूनही दूरध्वनी सेवा पोहोचलेली नाही. यावरुन भारतरत्नाच्या गावाचे भारत संचार निगमला वावडे असल्याचे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
समाजात माणसाला माणूस म्हणून जगण्याचा हक्क ज्यांनी मिळवून दिला. मानवी जातीच्या उद्धारासाठी आपले संपूर्ण आयुष्य झिजवले. देशाच्या सार्वभौमत्त्वाचा विचार करुन सर्व जातीधर्मांना समाजाभिमुख राज्य घटना दिली. अशा महापुरुषाचे मूळगाव रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील आंबडवे आहे. संपूर्ण देशाला अभिमान वाटावा असे महान कार्य करणाऱ्या बाबासाहेबांच्या गावाला देश-विदेशातील अनेक पर्यटक भेटी देत असतात. येथे आल्यानंतर नतमस्तक होऊन स्वत:ला धन्य मानतात. परंतु या महापुरुषाच्या गावाकडेच शासनाचे दुर्लक्ष होत असून, ज्यांनी समाजाला उज्ज्वल भविष्याचा मार्ग दाखविला, त्यांच्या गावाची अवस्था दयनीय आहे. भारतरत्न डॉ. आंबेडकर यांच्या मूळगावी त्यांचे स्मारक आहे. त्यांच्या घराचे स्मारकात रुपांतर झाले आहे. बाबासाहेबांच्या गावाबद्दल संपूर्ण जगाला आकर्षण असून, अनेक विचारवंत, पर्यटक, भीमसैनिक, बहुजन बांधव त्यांच्या गावाला जाऊन माथा टेकतात. त्यांच्या पुण्याईनेच आपण माणसात आहोत, अशी भावनाही अनेकजण व्यक्त करतात. मात्र, येथे येण्यासाठी अपुरी एस. टी. सुविधा, अरुंद रस्ते, रस्त्यावरील खड्डे, हॉटेल, विश्रामगृहाचा अभाव, त्याचप्रमाणे येथे सर्व प्रकारच्या मोबाईलला रेंज मिळत नाही. इंटरनेटची सुविधा नाही. भारत संचार निगमची दूरध्वनी सेवा नाही. करलो दुनिया मुठ्ठी मे, म्हणत जगभर इंटरनेटचे जाळे पसरत असले तरी मंडणगड शहरापासून अवघ्या २० किलोमीटर अंतरावर असणाऱ्या भारतरत्नाच्या मूळ गावात बीएसएनएलला आपली सुविधा पोहोचविण्यास विसर पडला आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून ६७ वर्षे झाली तरी अजूनपर्यंत भारतरत्नाच्या गावापर्यंत दूरध्वनी सेवा पोहोचू नये, यासारखे दुसरे दुर्दैव ते काय असू शकते?

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली म्हणून त्यांच्या मूळ गावात शासनाने मुुंबई विद्यापीठांतर्गत मॉडेल कॉलेज सुरु केले आहे. या कॉलेजमुळे आंतरराष्ट्रीय दर्जाचे उच्च शिक्षण मुलांना मिळणार आहे. इंटरनेटच्या माध्यमातून जगाशी संपर्क होण्यासाठी मॉडेल कॉलेजकडून दूरध्वनी विभागाला टेलिफोन सुविधा देण्यासाठी अर्ज करण्यात आला आहे. मात्र, ३६ लाख रुपयांचे कोटेशन देऊन ही रक्कम भरल्यास तुम्हाला दूरध्वनी व इंटरनेट सुविधा देऊ, असे पत्र देऊन भारतरत्नांच्या गावाबाबत असलेला दुजाभाव भारतीय संचार निगमने दाखवून दिला आहे.
- प्राचार्य, डॉ. गुलाबराव राजे, विद्यापीठ समन्वयक, मॉडेल कॉलेज, आंबडवे

अनेकांनी गैरसोय
ग्रामीण भागाशी इंटरनेटद्वारे जोडून प्रशासकीय कारभाराला गती देण्याबरोबरच इंटरनेटच्या सहाय्याने जगाशी तुलनात्मक स्पर्धा करण्याचा संकल्प सरकारने सोडला होता. मात्र हा संकल्प किती फसवा आहे हे यावरुन सिद्ध होत असल्याचे म्हटले जात आहे.

Web Title: 'India' communication corporation to Vavade 'Bharat' village?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.