स्वच्छता अभियानासाठी स्वतंत्र कोष
By Admin | Updated: November 25, 2015 03:18 IST2015-11-25T03:18:48+5:302015-11-25T03:18:48+5:30
राज्यात राबविण्यात येत असलेल्या स्वच्छ महाराष्ट्र अभियानासाठी स्वच्छ महाराष्ट्र कोष स्थापन करण्यास राज्य मंत्रिमंडळाने आज मान्यता दिली.

स्वच्छता अभियानासाठी स्वतंत्र कोष
मुंबई : राज्यात राबविण्यात येत असलेल्या स्वच्छ महाराष्ट्र अभियानासाठी स्वच्छ महाराष्ट्र कोष स्थापन करण्यास राज्य मंत्रिमंडळाने आज मान्यता दिली. स्वच्छ भारत अभियानांतर्गत राज्यातील ग्रामीण आणि नागरी भागात राबविण्यात येणाऱ्या योजनांसाठी हा कोष वापरण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री या कोषाचे अध्यक्ष असतील. तसेच पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री, नगरविकास राज्यमंत्री, मुख्य सचिव, अपर मुख्य सचिव (वित्त), प्रधान सचिव (नगर विकास-१), प्रधान सचिव (पाणीपुरवठा व स्वच्छता), सचिव (नगर विकास-२) यांचा सदस्य म्हणून समावेश असून, स्वच्छ महाराष्ट्र अभियानाचे राज्य संचालक हे कोषाध्यक्ष असतील. स्वच्छ भारत अभियानाच्या अंमलबजावणीसाठी वैयक्तिक शौचालये, सामुदायिक शौचालये आणि घनकचरा व्यवस्थापन यासाठी येणाऱ्या खर्चाच्या प्रमाणात प्राप्त होणारे केंद्र व राज्य शासनाचे अनुदान पुरेसे नाही. तसेच सार्वजनिक शौचालयांसाठी केंद्र व राज्य शासनाचे अनुदान उपलब्ध होणार नाही.
त्यामुळे या दोनही शासनाच्या निधींव्यतिरिक्त इतर स्रोतांमधून निधी उपलब्ध करण्याची गरज भासू लागली होती.
केंद्र शासनाने त्यांच्या स्तरावर सीएसआर (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी)मधून येणाऱ्या निधीसाठी स्वच्छ भारत कोष स्थापन केलेला आहे. निती आयोगाने स्वच्छ भारत अभियानासाठी नेमलेल्या अभ्यास गटाने राज्यस्तरावर यासाठी स्वतंत्र कोष निर्माण करण्याची शिफारस केली आहे.
त्यामुळे स्वच्छ महाराष्ट्राचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सीएसआरच्या मार्गाने निधी उभारणे गरजेचे
आहे, त्यासाठी स्वच्छ महाराष्ट्र कोष स्थापन करण्यात आला आहे. या कोषाची नोंदणी संस्था नोंदणी कायद्यानुसार केली जाईल.
(विशेष प्रतिनिधी)