Join us
Daily Top 2Weekly Top 5

सत्ताधारी-विरोधकांमध्ये लोकसभेसाठी रस्सीखेच; तर्क-वितर्कांना उधाण, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2023 10:05 IST

लोकसभा निवडणुका २०२४ अवघ्या काही महिन्यांवर आल्या आहेत.

मुंबई :लोकसभा निवडणुका २०२४ अवघ्या काही महिन्यांवर आल्या आहेत. लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली आहे. शिंदे गट, भाजप आणि अजित पवार गट विरुद्ध ठाकरे गट, काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट, वंचित आघाडी यांची इंडिया आघाडी यांच्यात ‘काटे की टक्कर’ अपेक्षित आहे. 

मुंबईत दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर मध्य मुंबई, उत्तर पूर्व मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई आणि उत्तर मुंबई असे सहा लोकसभा मतदारसंघ आहे. उत्तर मध्य मुंबई, उत्तर पूर्व मुंबई, उत्तर मुंबई हे तीन लोकसभा मतदारसंघ भाजपकडे आहेत.  दक्षिण मुंबई शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, तर दक्षिण मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई हे शिंदे गटाकडे आहे. उत्तर मुंबईतून विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांनी साडेनऊ वर्षांत प्रभावी कामगिरी केली आहे. त्यांच्या जागी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आणि केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांच्या नावांची चर्चा आहे. 

विद्यमान खासदार :

 उत्तर मुंबई : गोपाळ शेट्टी (भाजप)  उत्तर पश्चिम मुंबई : गजानन कीर्तिकर (शिंदे गट)  उत्तर मध्य मुंबई : पूनम महाजन (भाजप) दक्षिण मध्य मुंबई : राहुल शेवाळे ( शिंदे गट)  दक्षिण मुंबई : अरविंद सावंत (ठाकरे गट)  उत्तर पूर्व मुंबई : मनोज कोटक (भाजप)

यांच्या लढतीकडे लक्ष :

उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार  गजानन कीर्तिकर विरोधात ठाकरे गटातून त्यांचा मुलगा व उपनेते अमोल कीर्तिकर यांच्यात थेट लढत होणार का? अशी  चर्चा आता सुरू झाली आहे.

यांच्या नावाची आहे जोरदार चर्चा :

 दक्षिण मध्य मुंबईचे शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांच्या विरोधात ठाकरे गटामधून शिवसेना सचिव अनिल देसाई, माजी आमदार विशाखा राऊत यांच्या नावांची चर्चा आहे. दक्षिण मुंबईतून ठाकरे गटाचे विद्यमान खासदार अरविंद सावंत यांच्या विरोधात भाजप कोणाला तिकीट देणार अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

 उत्तर मध्य मुंबईतून भाजप विद्यमान खासदार पूनम महाजन यांना परत तिकीट देणार का? तर कॉंग्रेसमधून माजी राज्यमंत्री बाबा सिद्धीकी व माजी मंत्री नसीम खान यांच्या नावांची चर्चा सुरू झाली आहे. उत्तर पूर्व मुंबईतून भाजपाचे विद्यमान खासदार मनोज कोटक यांना परत उमेदवारी मिळणार का? राज्यसभेचे खासदार असलेले संजय राऊत येथून निवडणूक लढवणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे.

टॅग्स :मुंबईलोकसभाराजकारण