केडीएमटीला वाढीव अनुदान
By Admin | Updated: October 6, 2014 12:02 IST2014-10-06T04:51:47+5:302014-10-06T12:02:23+5:30
कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त रामनाथ सोनावणे यांनी शनिवारी ७५ लाखांचे वाढीव अनुदान केडीएमटी उपक्रमाला देण्याचे आदेश लेखा विभागाला दिले.

केडीएमटीला वाढीव अनुदान
कल्याण : परिवहन कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी देण्यात आलेले अनुदान अपुरे असल्याने कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त रामनाथ सोनावणे यांनी शनिवारी ७५ लाखांचे वाढीव अनुदान केडीएमटी उपक्रमाला देण्याचे आदेश लेखा विभागाला दिले. सोनावणे यांच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला असून यामुळे वेतन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
अपुरे उत्पन्न आणि वाढीव खर्च यामुळे केडीएमटी उपक्रमाला कर्मचाऱ्यांचे आॅगस्ट महिन्याचे वेतन देणे शक्य झाले नाही. सप्टेंबरचेही वेतन देणे शक्य नसल्याने कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाकडे अनुदानाची मागणी करण्यात आली होती.
वेतनासाठी कर्मचाऱ्यांनीही कल्याणचे सहायक कामगार आयुक्त अशोक चिवटे यांना निवेदन सादर करून न्याय देण्याची मागणी केली होती. केडीएमटी उपक्रमाने केलेल्या मागणीवर ५५ लाखांचे अनुदान महापालिकेकडून देण्यात आले. परंतु, कर्मचाऱ्यांच्या वेतनावर १ कोटी ३० लाख खर्च होत असल्याने देण्यात आलेले अनुदान अपुरे असल्याकडे केडीएमटी महाव्यवस्थापक सुधीर राऊत यांनी लक्ष वेधले होते. अखेर, शनिवारी आयुक्त सोनावणे यांनी वाढीव ७५ लाखांचे अनुदान देण्याचे आदेश दिल्याने कर्मचाऱ्यांना आॅगस्टचे वेतन देणे केडीएमटीला शक्य होणार आहे.
केडीएमटीच्या उत्पन्नात प्रचंड घट झाली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यात अडथळे येत होते.
सानुग्रह अनुदानावरच समाधान मानावे लागण्याची शक्यता दिसत होती. (प्रतिनिधी)