प्रचारसभांपेक्षा घरभेटीवर भर
By Admin | Updated: September 29, 2014 03:11 IST2014-09-29T03:11:05+5:302014-09-29T03:11:05+5:30
सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांचे अर्ज भरून झाले असून आता प्रचार सुरू झाला आहे. उमेदवारांनी मोठ्या सभांपेक्षा घरोघरी भेटी देण्यावर भर देण्याची रणनीती आखली

प्रचारसभांपेक्षा घरभेटीवर भर
नवी मुंबई : सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांचे अर्ज भरून झाले असून आता प्रचार सुरू झाला आहे. उमेदवारांनी मोठ्या सभांपेक्षा घरोघरी भेटी देण्यावर भर देण्याची रणनीती आखली असून छोट्या चौक सभाही घेण्यात येणार आहेत.
नवी मुंबईतील ऐरोली व बेलापूर मतदार संघातून तब्बल ४२ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. दोन्ही ठिकाणी प्रमुख उमेदवारांनी यापूर्वीच प्रचार सुरू केला आहे. भौगोलिकदृष्ट्या मतदार संघाचा आकार कमी असल्यामुळे मोठ्या सभा घेण्यापेक्षा प्रत्यक्ष मतदारांच्या घरी जाऊन आवाहन करण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँगे्रसचे उमेदवार गणेश नाईक यांनी यापूर्वीच मोठ्या रॅली व सभा जास्त घेणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. तर कार्यकर्त्यांनी आपल्या प्रभागातच काम करावे. प्रत्येक मतदाराच्या घरामध्ये जावून त्यांच्यापर्यंत पक्षाने केलेले काम व भविष्यातील योजनांची माहिती देण्याविषयी सूचना देण्यात आल्या आहेत. शिवसेनेनेही कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन मतदारांपर्यंत पोहचण्याच्या सूचना केल्या आहेत. प्रत्येक पदाधिकाऱ्यावर त्यांच्या विभागातील सामाजिक संस्था, संघटनांची भेट घेऊन त्यांना पक्षाची भूमिका समजवण्याचे जबाबदारी दिली आहे. सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी प्रचारासाठी कार्यकर्त्यांची फौज दाखविण्यापेक्षा कमीत कमी संख्येने घरोघरी जाऊन प्रचार करण्यावर भर दिला आहे. (प्रतिनिधी)