Join us
Daily Top 2Weekly Top 5

वाढते प्रदूषण, तलावांतील अस्वच्छतेमुळे पक्ष्यांचा अधिवास धोक्यात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2019 02:22 IST

पर्यावरणप्रेमींचे मोदींना पत्र : मुंबई महानगर प्रदेशातील पाच क्षेत्रे पक्ष्यांसाठी राखीव ठेवण्याची मागणी

सागर नेवरेकर 

मुंबई : चारकोपचा टर्झन हिल तलाव, अंधेरीतील लोखंडवाला तलाव, नवी मुंबईच्या पाम बीच रोडवरील टीएस चाणक्य आणि डीपीएस पाँड, सीवूड-एलआरआय वेटलँड आणि उरणच्या पंजे पानथळ भागात पक्ष्यांचा सर्वाधिक अधिवास आढळून येतो. मात्र, दिवसेंदिवस होत असलेली पर्यावरणाची हानी आणि या तलावांत पसरू लागलेल्या घाणीच्या साम्राज्यामुळे बऱ्याच प्रजातींच्या पक्ष्यांनी हा अधिवास सोडण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे ‘स्वच्छ भारत अभियाना’वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, उपरोल्लेखीत पाचही ठिकाणे पक्ष्यांच्या अधिवासासाठी राखीव ठेवण्याची मागणी पक्षिप्रेमींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

मुंबई बर्ड रेस या संस्थेने यासाठी पुढाकार घेतला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पक्ष्यांच्या या अधिवासाची यादी पाठविली आहे. मुंबई महानगर प्रदेशातील या पाच ठिकाणांमध्ये मोठा तापस (ग्रेट बिटर्न), पाण फटाकडी (वॉटर रेल), लाल मानेचा फलारोप (रेड-नेकेड फलारोप) आणि ठिपकेवाला माशीमार (स्पॉटेड फ्लायकॅचर) हे दुर्मीळ पक्षी निरीक्षणातून आढळून आले आहेत. मोठा रोहित (ग्रेटर फ्लेमिंगो), छोटा रोहित (लेसर फ्लेमिंगो), उचाट्या (पीड अवोसेट्स) इत्यादी स्थलांतरित पक्षीही दिसून आले आहेत, तसेच कांदिवलीतील टर्झन हिलच्या तलावात रात ठोकरी (ब्लॅक क्रोनेड नाइट हेरोन) हा पक्षी आढळून आला. मात्र, प्रदूषण आणि वाढत्या शहरीकरणामुळे हे पक्षी अधिवास सोडत असल्याचे पक्षीप्रेमींनी सांगितले.

वाढत्या शहरीकरणामुळे पक्ष्यांच्या अधिवासात लक्षणीय बदल झालेले दिसून येतात. वृक्षांची तोड आणि विकास प्रकल्पांमुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडत आहे. नवी मुंबईतील पंजे पानथळ भागात पक्ष्यांच्या २२० प्रजातींची नोंद करण्यात आली आहे. त्यातील ३ ते ४ पक्ष्यांच्या प्रजाती या मुंबई क्षेत्रात आढळून आल्या. उपरोल्लेखीत पाच ठिकाणी पक्ष्यांसाठी अनुकूल वातावरण असून, तिथे बºयापैकी पक्ष्यांचा वावर दिसून येतो. त्यामुळे या जागा पक्ष्यांच्या अधिवासासाठी संरक्षित ठेवण्याचा प्रयत्न पक्षिप्रेमींकडून सुरू आहे, अशी माहिती पक्षी निरीक्षक कुणाल मुनसिफ यांनी दिली.तलावांत घाणीचे साम्राज्य!पक्ष्यांचा अधिवास असलेल्या या पाचही ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा टाकणे, परिसरात मद्यपान करणे, मोठ्या आवाजात लाउड स्पीकर वाजविणे आणि शौचालयास जाणे असे गैरप्रकार घडतात. त्यामुळे या पाचही तलावांत घाणीचे साम्राज्य पसरू लागले आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘स्वच्छ भारत अभियाना’वर पक्षिप्रेमींनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

टॅग्स :मुंबईपक्षी अभयारण्यनैसर्गिक आपत्ती