सायन-पनवेल मार्गावर वाढते अपघात

By Admin | Updated: August 10, 2014 23:55 IST2014-08-10T23:55:39+5:302014-08-10T23:55:39+5:30

सायन-पनवेल महामार्गावर गेल्या अडीच वर्षांत १५५ जणांचा अपघाती मृत्यू झाला आहे. कोट्यवधी रुपये खर्चून तयार केलेल्या या मार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे सातत्याने अपघात घडत आहेत

Increasing accidents on the Sion-Panvel route | सायन-पनवेल मार्गावर वाढते अपघात

सायन-पनवेल मार्गावर वाढते अपघात

नवी मुंबई : सायन-पनवेल महामार्गावर गेल्या अडीच वर्षांत १५५ जणांचा अपघाती मृत्यू झाला आहे. कोट्यवधी रुपये खर्चून तयार केलेल्या या मार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे सातत्याने अपघात घडत आहेत. त्यामुळे संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे.
सायन-पनवेल मार्गाचे नुकतेच रुंदीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. परंतु पावसाळ्यापूर्वी अत्यंत घाईमध्ये ठेकेदाराने हे काम उरकल्याने अवघ्या काहीच दिवसात या मार्गावर खड्डे पडल्याचे चित्र दिसत आहे. या खड्ड्यांमुळे सदर मार्गावर वाहतूक कोंडी होत असून अनेक अपघातही घडत आहेत. अशातच सदर मार्गावर गेल्या अडीच वर्षांत घडलेल्या सुमारे ६०० अपघातांमध्ये १५५ जणांचे मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. आयआयटीच्या सर्वेक्षण अहवालानुसार या मार्गावर १ हजार १५१ तडे गेले आहेत. त्यामुळे ठिकठिकाणी या महामार्गाचे काम नव्याने करावे लागणार आहे.
त्यामुळे या अपघातांना ठेकेदाराला जबाबदार धरून त्याच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी शिवसेनेचे उपशहर प्रमुख विजय माने यांनी केली आहे. त्याकरिता सायन-पनवेल महामार्ग ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतो त्या प्रत्येक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार असल्याचे माने यांनी सांगितले. तसेच मार्गाच्या रुंदीकरण कामाच्या दर्जाबाबत देखील त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. तर टोलनाका सुरू करण्यासाठीच या मार्गाचे काम जलदगतीने उरकण्यात आले असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Increasing accidents on the Sion-Panvel route

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.