रमजाननिमित्त भिवंडीत दुधाची भाववाढ
By Admin | Updated: July 17, 2015 23:07 IST2015-07-17T23:07:39+5:302015-07-17T23:07:39+5:30
रमजान ईदनिमित्ताने शिरकुर्मा बनविण्यासाठी लागणाऱ्या दुधाच्या किमतीत गेल्या तीन दिवसांपासून लक्षणीय भाववाढ झाली असून दूध विक्रेत्यांवर कोणाचेही नियंत्रण नसल्याचे पुन्हा एकदा प्रत्ययास आले आहे.

रमजाननिमित्त भिवंडीत दुधाची भाववाढ
भिवंडी : रमजान ईदनिमित्ताने शिरकुर्मा बनविण्यासाठी लागणाऱ्या दुधाच्या किमतीत गेल्या तीन दिवसांपासून लक्षणीय भाववाढ झाली असून दूध विक्रेत्यांवर कोणाचेही नियंत्रण नसल्याचे पुन्हा एकदा प्रत्ययास आले आहे.
तीन दिवसांपूर्वी शहरात दूधविक्रीचा भाव ६६ रुपये होता. गुरुवारी ७०-७५ रुपयांनी शहरातील विक्रेत्यांनी दूध विकले. शुक्रवारी सकाळपासून ते ८० रुपयांनी विकले. मात्र, सायंकाळी चाँद दिसल्यानंतर व ईद झाल्यानंतर मुस्लिम भागात दुधाच्या भावाने २४ रुपयांनी उसळी मारून ९० रुपयांनी विक्री झाली. भिवंडी हे मुस्लिमबहुल शहर असल्याने रमजान ईदनिमित्ताने शिरकुर्मा बनविण्यासाठी शहरात लाखो लीटर दूधविक्री होते. मुस्लिम समाजातील प्रत्येक गरीब-श्रीमंतांकडे तो बनविला जातो. त्याचा गैरफायदा घेत शहरातील दूधविक्रेते अचानक भाववाढ करून दूधविक्री करतात. यामुळे ऐन सणाच्या काळात गरिबांच्या खिशाला चाट बसते. शहरात मोठ्या संख्येने यंत्रमाग कामगारवर्ग राहत आहे. असे असताना वर्षातून एकदा येणाऱ्या ईदच्या सणासाठी ही भाववाढ रोखली पाहिजे, अशी भूमिका कोणताही राजकीय पक्ष घेत नाही. त्यामुळे वर्षानुवर्षे दूधविक्रेत्यांची मनमानी सुरू आहे. (प्रतिनिधी)