मुंबई - मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या लोकलमध्ये अपंग आणि कर्करोगाच्या रुग्णांसाठी राखीव डब्ब्यामधून इतर प्रवासी सर्रास प्रवास करतात. अशा प्रवाशांवर आरपीएफकडून कारवाई केली जात आहे. तीन महिन्यांत अडीच हजारांपेक्षा अधिक प्रवाशांवर कारवाई केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
लोकलमधील प्रवाशांच्या वाढत्या गर्दीमुळे दिव्यांगांसाठी राखीव असलेल्या डब्यांतून धडधाकट प्रवासीही सहज प्रवास करतात. अनेकदा दिव्यांग प्रवासी त्यांना प्रवेश करण्यास अटकाव करतात. मात्र, गर्दीमुळे या डब्यात शिरणाऱ्यांना आवरणे दिव्यांगांनाही कठीण होते. अनेकदा या डब्यांतून ज्येष्ठ नागरिक, महिला, ड्युटीवर नसलेले पोलिस प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे यावर ठोस उपाययोजना करण्याची मागणी दिव्यांग प्रवाशांकडून होत आहे. अपंगांच्या डब्यात अपंगापेक्षा सामान्य प्रवाशांचे प्रमाण जास्त आहे. मात्र ४-५ जणांना कारवाई होते. तक्रारी करूनही अपेक्षित कारवाई होत नाही, असे निर्धार विकलांग विकास संघाचे अध्यक्ष नितीन गायकवाड यांनी सांगितले.
दिव्यांग डब्यातून प्रवास करणाऱ्या इतर प्रवाशांवर कारवाई करतो. गेल्या तीन महिन्यांमध्ये अडीच हजार जणांवर कारवाई केली आहे. - ऋषी शुक्ल, वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त, मध्य रेल्वे
दिव्यांग डब्ब्यात अनधिकृत प्रवाशांविरुद्ध आम्ही कारवाई करतो. गेल्यावर्षी १२,००० पेक्षा अधिक अनधिकृत प्रवाशांकडून २६ - विनीत अभिषेक, मुख्य जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे
पश्चिम रेल्वेची १४ हजार ८५२ प्रवाशांवर कारवाई पश्चिम रेल्वेने गेल्या दोन वर्षांमध्ये दिव्यांग डब्यातून प्रवास करणाऱ्या १४ हजार ८५२ प्रवाशांवर केली असून त्यांच्याकडून ३१ लाख ४६ हजार ९७० दंड वसूल केला आहे. २०२४ मध्ये दिव्यांग डब्यातून प्रवास करणाऱ्या १२,१७९ प्रवाशांकडून २६,३६,५७० रुपयांचा दंड वसूल केला आहे. तर २०२५ मध्ये मार्चपर्यंत २,६७३ प्रवाशांवर कारवाई करून त्यांच्याकडून ५,१०,४०० रुपयांचा दंड वसूल केला.