Join us  

आरे वसाहतीत कृत्रिम तलावांची संख्या वाढवा, भाजपाची पालिका आयुक्तांना विनंती

By मनोहर कुंभेजकर | Published: September 26, 2023 4:30 PM

आरे वसाहतीमधील तीनही तलावामध्ये गणेश मूर्ती विसर्जनासाठी मनाई करण्यात आली.

मुंबई - दरवर्षी गोरेगाव (पूर्व ) आरे कॉलनी गोरेगांव येथे गोरेगांव (पूर्व – पश्चिम), जोगेश्वरी (पूर्व), अंधेरी (पूर्व), मालाड (पूर्व) या भागातील गणेश मूर्तींचे  मोठ्या प्रमाणात विसर्जन केले जाते. दरवर्षी आरे वसाहतीमधील तीन मोठे तलाव आणि कृत्रिम तलावात विसर्जन होते. परंतू न्यायालयीन आदेशानुसार यावर्षी आरे वसाहती मधील तीनही तलावामध्ये गणेश मूर्ती  विसर्जनासाठी मनाई करण्यात आली. त्यामुळे महापालिकेने कृत्रिम तलाव उभारण्यासाठी कार्यकारी अधिकारी, आरे वसाहत यांच्याकडे परवानगी मागीतली होती. त्यांनी परवानगी फेटाळल्यामुळे या निर्णयाच्या विरोधात आम्ही  उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. यावर निर्णय देताना न्यायालयाने कृत्रिम तलाव उभारणीस परवानगी देताना सदर बाबत निर्णय अध्यक्ष, पर्यावरण संवेदनशील क्षेत्र नियंत्रण समिती यांनी घ्यावा असे निर्देश दिले आहेत. 

ही बाब लक्षात घेऊन उपरोक्त न्यायालयीन  निर्देशानुसार आरेत जास्तीत जास्त कृत्रिम तलाव तातडीने उभारणे आवश्यक आहे. याबाबत अनंत चतुर्दशीला होणाऱ्या गणेश मूर्तींच्या विसर्जनाची सांख्यिकी माहिती घेऊन तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन आरेत अतिरिक्त गणेश विसर्जन तलाव उभारण्याबाबत आवश्यक कार्यवाही करावी अशी विनंती भाजपाचे माजी नगरसेवक प्रभाकर शिंदे यांनी मुंबई महापालिका आयुक्त तथा अध्यक्ष - पर्यावरण संवेदनशील क्षेत्र नियंत्रण समितीचे अध्यक्ष डॉ.इकबाल सिंह चहल यांच्या कडे एका पत्राद्वारे केली आहे. लोकमतने देखील सातत्याने हा विषय मांडला आहे.

गेल्या वर्षी ३४३१ (३१०५ घरगुती गणेश मूर्ती + ३२६ सार्वजनिक गणेश मूर्ती)  गणेश मूर्तींचे विसर्जन आरे वसाहतीतील तीन नैसर्गिक तलाव आणि सात कृत्रिम तलावांमध्ये झाले होते. गेल्या वर्षी अनंत चतुर्दशी दिवशी ६९७ घरगुती व २०१ सार्वजनिक गणेश मूर्तींचे विसर्जन झाले होते. यावर्षी येथे एकमात्र कृत्रिम तलाव उपलब्ध आहे आणि सहा वाहनारूढ छोटे कृत्रिम तलाव उपलब्ध आहेत. हि व्यवस्था गणेश विसर्जनासाठी पुरेशी पडणार नाही. त्यामुळे विसर्जनाच्या दिवशी मोठ्या प्रमाणात गर्दी होईल व विसर्जनास विलंब होईल असे सकृत दर्शनी वाटते असे प्रभाकर शिंदे यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.

ही बाब लक्षात घेऊन उपरोक्त न्यायालयीन  निर्देशानुसार आरे वसाहतीत जास्तीत जास्त कृत्रिम तलाव तातडीने उभारणे आवश्यक आहे. याबाबत अनंत चतुर्दशीला होणाऱ्या गणेश मूर्तींच्या विसर्जनाची सांख्यिकी माहिती घेऊन तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन अतिरिक्त गणेश विसर्जन तलाव उभारण्याबाबत आवश्यक कार्यवाही करावी अशी विनंती त्यांनी केली आहे.

टॅग्स :मुंबईभाजपागणेशोत्सव