अतिरिक्त आयुक्तांच्या संख्येत वाढ
By Admin | Updated: January 8, 2015 01:46 IST2015-01-08T01:46:29+5:302015-01-08T01:46:29+5:30
मुंबईवगळता इतर नऊ महापालिकांच्या अतिरिक्त आयुक्तपदांच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे.

अतिरिक्त आयुक्तांच्या संख्येत वाढ
ठाणे : राज्यातील महापालिकांच्या वर्गवारीत बदल केल्यानंतर, आता तेथील वाढता पसारा लक्षात घेता त्यांच्या कारभारात सुसूत्रता यावी, यासाठी मुंबईवगळता इतर नऊ महापालिकांच्या अतिरिक्त आयुक्तपदांच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे. नगरविकास विभागाने हा निर्णय घेतला आहे़ यानुसार, पुणे आणि नागपूर या ‘अ’ वर्ग महापालिकांत तीन तर तर ठाणे, नाशिक, पिंपरी-चिंचवड या ‘ब’ वर्ग महापालिकांसह नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, औरंगाबाद, वसई-विरार या ‘क’ वर्ग महापालिकांत आता दोन अतिरिक्त आयुक्तांची नियुक्ती करणे सोपे झाले आहे़
‘ब’ वर्ग महापालिकांतील तीनपैकी दोन तर ‘क’ वर्ग महापालिकांतील दोनपैकी एका अतिरिक्त आयुक्ताच्या पदावर शासनसेवेतील अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचे बंधन घालण्यात आले आहेत़
उर्वरित पदांवर पालिका सेवेतील अधिकाऱ्यांची सेवाज्येष्ठता आणि त्यांच्या गुणवत्तेसह क्षमता आणि गोपनीय अभिलेखाच्या आधारे नियुक्ती करावयाची आहे़
याकरिता पात्र असणाऱ्या पाच अधिकाऱ्यांच्या नावांचा प्रस्ताव संबंधित महापालिकांच्या आयुक्तांनी मंजुरीसाठी शासनाकडे सादर करावयाचा आहे़ यानंतर, शासनाने नियुक्त केलेल्या नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव-२ यांच्या अध्यक्षतेखालील समिती प्राप्त शिफारशींची छाननी करून अतिरिक्त आयुक्तांच्या निवडीचा प्रस्ताव शासनास सादर करेल़
या समितीत आयुक्त तथा संचालक नगर परिषद संचालनालय, ज्येष्ठतम महापालिका आयुक्त, संबंधित महापालिकेचे आयुक्त, उपसचिव आणि अवर सचिवांचा समावेश आहे़ यामुळे महापालिकांत अतिरिक्त आयुक्त म्हणून आपली वर्णी लागावी, यासाठी शासन सेवेतील अधिकाऱ्यांत चढाओढ सुरू होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. (प्रतिनिधी)
महापालिका सेवेत किमान १० वर्षांचा अनुभव, १० पैकी ९ गोपनीय अहवाल अत्युत्कृष्ट असावेत़ तसेच ज्या अधिकाऱ्यांविरुद्ध विभागीय चौकशी, दक्षता, फौजदारी कार्यवाहीविषयक प्रकरणे प्रलंबित आहेत, त्यांच्या नावांची शिफारस करू नये, असे बंधन घालण्यात आले आहे़