उत्तम कलाकार घडविण्याची चळवळ वाढावी
By Admin | Updated: January 7, 2015 00:20 IST2015-01-07T00:20:27+5:302015-01-07T00:20:27+5:30
प्रायोगिक संस्थांमधून भविष्यात चांगल्या कलाकारांची निर्मिती होऊ शकेल.

उत्तम कलाकार घडविण्याची चळवळ वाढावी
मुंबई : प्रायोगिक संस्थांमधून भविष्यात चांगल्या कलाकारांची निर्मिती होऊ शकेल. अशी एक चळवळ वाढण्याची नितांत आवश्यकता असून त्यादृष्टीने आपण अशा संस्थांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू, असे आश्वासन सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी दिले. ‘आविष्कार’सारख्या प्रायोगिक रंगभूमीवर गेली ४४ वर्षे काम करणाऱ्या संस्थेचे कार्य राज्यातील जिल्हा पातळीवर पोहोचणे गरजेचे आहे.
आविष्कार आयोजित २८ व्या अरविंद देशपांडे स्मृती महोत्सवाचे उद्घाटन विनोद तावडे यांच्या हस्ते झाले. आविष्कारसारख्या संस्थांच्या कार्यातून उत्तम व गुणवान कलाकारांची निर्मिती व्हायला हवी यासाठी आपण नक्कीच पुढाकार घेऊ, असेही तावडे यांनी सांगितले. कलेला राजाश्रय मिळाला पाहिजे, पण या राजाश्रयाची जाहिरातबाजी होता कामा नये, असे आपले मत असल्याचे सांगतानाच ते म्हणाले की, सांस्कृतिक खात्याचा मंत्री म्हणून आपल्या हस्ते कोणत्याही शासकीय पुरस्काराचे वितरण होऊ नये तर हे वितरण त्या क्षेत्रातील ज्येष्ठ आणि अनुभवी कलाकारांच्या हस्ते होणे गरजेचे आहे या मताचे आपण असून सांस्कृतिक खात्याने हा नवीन पायंडा पाडला आहे, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.
सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हे नेहमीच व्यावसायिक निवेदिका अथवा चॅनेल्सच्या वृत्त निवेदिका करतात, पण यापुढे ही प्रथा बंद करून अशा सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हे त्या भागातील महाविद्यालयीन विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी केले पाहिजे, जेणेकरून अशा विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळेल असे आपले ठाम मत असून ही नवीन संकल्पना आपण लवकरच सुरू करणार असल्याचेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)