पनवेलमध्ये दूध उत्पन्नात वाढ
By Admin | Updated: July 6, 2015 23:26 IST2015-07-06T23:26:29+5:302015-07-06T23:26:29+5:30
वाढत्या लोकसंख्येमुळे शहरात तबेल्याच्या दुधाची मागणी वाढली आहे. त्यामुळे पनवेल तालुक्यात तबेल्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत असून दूध उत्पन्न वाढविण्याबरोबरच शेतकऱ्यांना प्रोत्साहन

पनवेलमध्ये दूध उत्पन्नात वाढ
प्रशांत शेडगे :-
पनवेल : वाढत्या लोकसंख्येमुळे शहरात तबेल्याच्या दुधाची मागणी वाढली आहे. त्यामुळे पनवेल तालुक्यात तबेल्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत असून दूध उत्पन्न वाढविण्याबरोबरच शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यावरही भर देणार असल्याचे तालुका पशुसंवर्धन कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. गेल्या काही वर्षांत दुग्धजन्य पाळीव प्राण्यांची कमी झालेली संख्या पुन्हा वाढत असल्याचे मत अधिकाऱ्यांनी यावेळी नोंदवले.
एकेकाळी पनवेल, उरणमध्ये भातलागवडीखालील क्षेत्र मोठे होते. शेतीला जोड म्हणून परिसरात पशुपालन केले जायचे. मात्र सिडकोने पिकत्या जमिनी संपादित करून त्या जागेवर नागरी वसाहती विकसित केल्या. त्यामुळे शेती व्यवसायाबरोबरच पशुधनही घटले. तालुक्यात हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच म्हशीचे तबेले गेल्या काही वर्षांपासून सुरू आहेत. या ठिकाणचे दूध पनवेल शहरात विक्रीकरिता आणले जाते. पनवेल शहराबरोबर नवीन पनवेल, खारघर, कामोठे, कळंबोली, द्रोणागिरी, उलवे, तळोजा, नावडे, करंजाडे यासारख्या सिडको वसाहती विकसित झाल्या आहेत आणि याठिकाणी तबेल्यातील दुधाची मागणी वाढली.
पनवेल परिसरात घाटमाथ्यावरून दूध येत असून त्यामध्ये वारणा, गोकुळ, महानंद, प्रभात त्याचबरोबर अमुलचा समावेश आहे. वास्तविक पाहता या दुधावर प्रक्रि या केल्यानंतर ते शहरात येते. त्याचबरोबर भेसळीचे प्रकार जास्त होत असल्याने बाहेरून येणाऱ्या सुट्या दुधाबाबतही प्रश्न निर्माण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर आजूबाजूच्या गावातून येणाऱ्या दुधाला मागणी वाढली आहे. हे दूध ताजे असते, त्याचबरोबर भेसळीचे प्रकार फारसे घडत नाही. त्यामुळे जास्त पैसे मोजून हे दूध घेण्याकडे ग्राहकांचा कल आहे. या व्यवसायाला आलेले अच्छे दिन पाहता नेरे, पोयंजे, नितळस, गिरवले, वाजे, पेठाली, शिवकर, मोह, सांगुर्ली, शिरढोण, मोर्बे या परिसरात तबेल्यांमध्ये वाढ झाल्याची माहिती तालुका पशुसंवर्धन कार्यालयातून देण्यात आली. २0१३- १४ या वर्षात फक्त १६ म्हशींचे तबेले होते. आता ही संख्या २४ वर पोहचली आहे.