चर्चेच्या गु-हाळानंतरही पालिकेची आमदनी वाढेना
By Admin | Updated: December 17, 2014 23:17 IST2014-12-17T23:17:12+5:302014-12-17T23:17:12+5:30
महापालिकेत एलबीटी लागू झाल्यानंतर पालिकेचा आर्थिक डोलारा कोलमडला असून आजही पालिकेची स्थिती खालावलेली आहे.

चर्चेच्या गु-हाळानंतरही पालिकेची आमदनी वाढेना
ठाणे : पालिकेचा कोलमडलेल्या आर्थिक परिस्थितीला लक्षवेधीच्या माध्यमातून वाचा फोडून उपाय योजना करण्याच्या आणाभाका मारणाऱ्या सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवकांनी या एकाच लक्षवेधीवर महिनाभर तब्बल चार वेळा चर्चा करुन पालिकेचा लाखो रुपयांचा निधी खर्ची घातल्याची बाब आता समोर आली आहे. विशेष म्हणजे एवढी चर्चा करुनही अद्यापही त्यावर तोडगा काढण्यात सर्व पक्षीय नगरसेवकांना यश आले नसून केवळ प्रशासनावर खापर फोडून त्यांनी महासभा रेटून नेण्याचा प्रयत्न केला आहे.
महापालिकेत एलबीटी लागू झाल्यानंतर पालिकेचा आर्थिक डोलारा कोलमडला असून आजही पालिकेची स्थिती खालावलेली आहे. कर्मचाऱ्यांचा पगार निघेल एवढाच निधी पालिकेच्या तिजोरीत शिल्लक असून, ठेकेदारांची सुमारे ७० कोटींची बिले थकीत आहेत. विशेष म्हणजे ही स्थिती सुधारण्यासाठी काही महिन्यांपूर्वी स्थायी समितीच्या बैठकीतही चार ते पाच वेळा सांगोपांग चर्चा झाली. त्यानंतर उत्पन्न वाढीसाठी उपसमिती देखील नेमली गेली. परंतु या उपसमतीच्या देखील एक ते दोनच बैठका आतापर्यंत झाल्या आहेत. केवळ चर्चांचे फड या बैठकीतून रंगत असून उत्पन्न वाढीसाठी लोकप्रतिनिधी अथवा प्रशासनानेदेखील कोणत्याही प्रकारचे ठोस पावले उचलेली दिसून आली नाहीत.
असे असतांना देखील याच मुद्दाला धरुन कॉंग्रेसचे नगरसेवक संजय घाडीगावकर यांनी मागील महिन्यात २० तारेखला महासभेत लक्षवेधी मांडली होती. परंतु यावर चर्चा करण्याऐवजी सुरवातीला विरोधकांनी पालिका प्रशासनाची अंत्ययांत्रा काढून आंदोलन केले. त्यानंतर महासभेत जावखेडे येथे झालेल्या हत्येच्या निषेधावरुन सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांसमोर उभे ठाकल्याचे दिसून आले. डायसवर जाऊन त्यांच्या हाणामारी देखील झाली. त्यामुळे महापौरांना संपूर्ण वेळ सभा स्थगित करावी लागली. त्यानंतर बॅरीस्टर अंतुले यांच्या निधानामुळे महासभा तहकूब करावी लागली. या नंतर ११ डिसेंबर रोजी पुन्हा याच लक्षवेधीवर महासभा सुरु झाली. दुपारी एक वाजता सुरु होणारी महासभा सव्वा तास उशिराने सुरु झाली. त्यानंतर सांयकाळी पाच वाजेपर्यंत चर्चा सुरु असतांनाच महापौर संजय मोरे यांनी खो - खो स्पर्धेचा बक्षीस समांरभ असल्याचे सांगून या सभेलाच खो दिला. त्यामुळे ही चर्चा अर्ध्यावरच राहिली.
पुन्हा चवथ्यांदा ही सभा बुधवारी दुपारी दोन वाजता घेण्यात आली. अपेक्षेप्रमाणे ती पाऊण तास उशिराने सुरु झाली. यावेळी उत्पन्न का घटले, कोणामुळे घटले, याचे सर्वोतोपरी खापर सदस्यांनी प्रशासनावर फोडले. मालमत्ता कर विभागात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप कॉंग्रेस नगरेसवक विक्रांत चव्हाण यांनी केला. तसेच इतर विभागातही काही प्रमाणात भ्रष्टाचार असल्याचे सांगून त्यांनी या सर्व प्रकरणांच्या चौकशीची मागणी केली. काही नगरसेवकांनी तर मुद्दा सोडून इतर मुद्यांवर चर्चा करुन सभागृहाचा वेळ वाया घालविला. तर पालिकेच्या नाहक वाया जाणाऱ्या या निधीकडे का लक्ष जात नाही? असा सवालही आता उपस्थित केला गेला आहे.