घाटकोपर मानखुर्द उड्डाणपुलावर अपघातांमध्ये वाढ; पावसात उड्डाणपूल करावा लागतो बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:12 IST2021-09-02T04:12:05+5:302021-09-02T04:12:05+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : महिन्याभरापूर्वी खुल्या करण्यात आलेल्या घाटकोपर मानखुर्द उड्डाणपुलावर अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्यामुळे ...

Increase in accidents on Ghatkopar Mankhurd flyover; The flyover has to be closed in the rain | घाटकोपर मानखुर्द उड्डाणपुलावर अपघातांमध्ये वाढ; पावसात उड्डाणपूल करावा लागतो बंद

घाटकोपर मानखुर्द उड्डाणपुलावर अपघातांमध्ये वाढ; पावसात उड्डाणपूल करावा लागतो बंद

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : महिन्याभरापूर्वी खुल्या करण्यात आलेल्या घाटकोपर मानखुर्द उड्डाणपुलावर अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्यामुळे हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी धोकादायक असल्याची भीती वाहनचालकांमध्ये निर्माण झाली आहे. पुलावरील रस्ता पावसात अत्यंत निसरडा बनत असल्याने पहिल्या दिवसापासूनच या उड्डाणपुलावर अपघात सत्र सुरू झाले आहे. यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या अपघातांमध्ये दुचाकींचा समावेश मोठ्या प्रमाणात असल्याने दुचाकीस्वारांच्या चिंतेत भर पडली आहे. त्याचप्रमाणे वाहनचालक रस्त्याच्या दर्जाबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.

सोमवारी या रस्त्यावर ऑइल पसरल्याने अनेक दुचाकींचे अपघात झाले. या अपघातांमध्ये मोहम्मद युसूफ खान या दुचाकीस्वाराला आपला जीव गमवावा लागला, तर याआधीदेखील आरीफ साहा (३६) या दुचाकीस्वाराला या उड्डाणपुलावर एका कारने धडक दिली. यावेळी तो थेट उड्डाणपुलावरून खाली कोसळला. या अपघातात त्याचा जीव गेला. त्यामुळे हा उड्डाणपूल आता मृत्यूचा सापळा बनत चालला आहे.

पावसात उड्डाणपूल करावा लागतो बंद

पावसात अपघातांचे प्रमाण वाढत असल्याने स्थानिक पोलीस हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद करतात. मंगळवारी पाऊस सुरू झाल्यानंतर तब्बल दोन तास हा पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. मात्र, वाहन चालक यामुळे नाराज झालेले पाहायला मिळत आहेत. उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद करणे हा उपाय नसून, असे किती दिवस करत राहणार, असा प्रश्न वाहन चालक उपस्थित करत आहेत.

-किशोर शिंदे (पोलीस निरीक्षक, वाहतूक विभाग मानखुर्द)

- उड्डाणपुलावर बेदरकारपणे वाहन चालवण्याचे प्रमाण वाढले आहे. रस्ता गुळगुळीत असल्याने अपघात होतात. या उड्डाणपुलासंदर्भात अभियंत्यांना तक्रार करण्यात आली आहे व काही उपायदेखील सुचविण्यात आले आहेत. या पुलावर सीसीटीव्ही, वाहनाचा वेग तपासण्याची मशीन, रंबलर्स व स्थानिक पोलीस असणे गरजेचे आहे, तसेच येथे ५० ची वेगमर्यदा पाळणे गरजेचे आहे.

Web Title: Increase in accidents on Ghatkopar Mankhurd flyover; The flyover has to be closed in the rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.