Join us  

चुकीचे ई-चलन आले; काय कराल? अशी करा तक्रार 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2024 11:28 AM

वाहन क्रमांकावरील चुकीच्या किंवा अर्धवट, हेराफेरी केलेल्या क्रमांकामुळे चुकीचे ई-चलन जारी केल्याच्या तक्रारी समोर येतात.

मुंबई : कुठलेही नियम न मोडता आलेल्या ई-चलनाच्या संदेशाने अनेकांचा गोंधळ उडताना दिसतो. वाहन क्रमांकावरील चुकीच्या किंवा अर्धवट, हेराफेरी केलेल्या क्रमांकामुळे चुकीचे ई-चलन जारी केल्याच्या तक्रारी समोर येतात. गेल्या वर्षभरात वाहतूक पोलिसांकडे १ लाख ४४ हजार ९२० ई-चलन संबंधित तक्रारी आल्या. त्यापैकी खातरजमा करत १७ हजार ९१७ चलन रद्द केले आहेत. तुम्हालाही असे ई-चलन आल्यास पोलिसांच्या संकेतस्थळावर ते रद्द करण्याची सुविधा उपलब्ध आहे. 

...तरच रद्द होईल चलन 

चुकीचे ई-चलन गेल्याची तक्रार येताच त्यासंबंधित योग्य ते पुरावे सबमिट केल्यास ते रद्द केले जाते. एक्सवरील वाहतूक पोलिसांच्या हँडलवर तसेच वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षात येणाऱ्या कॉलमध्ये माहिती देणाऱ्या कॉलचे प्रमाण अधिक आहे. एक्स हॅण्डलवर दिवसाला दोनशेहून अधिक ट्विट येतात. तक्रारीतील माहिती, फोटो अचूक असल्यास त्यावर कारवाई करण्यात येते. अनेकदा पत्ता पूर्ण असून, फोटोबाबत माहिती नसल्यास पोलिसांना त्या स्पॉटवर पाठवून खातरजमा करून कारवाई होते. 

आतापर्यंत किती दंड जारी?

वाहतूक पोलिसांनी गेल्या पाच वर्षांत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध २ कोटी ८६ लाख ११ हजार ४८५ ई-चलन जारी केले. १ हजार २२३ कोटी ६ लाख ७८ हजार ५६२ रुपयांचा दंड ठोठावला. यापैकी आतापर्यंत १ कोटी ४३ लाख ४४ हजार ७७८ ई-चलनाची ५५३ कोटी ६३ लाख ९५ हजार ६६२ रुपयांची वसुली केली आहे.

ऑनलाइन तक्रार प्रक्रिया -

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने लोकांना चुकीचे ट्रॅफिक चलन जारी केल्याबद्दल तक्रार करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. जिथे तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकता.

टॅग्स :मुंबईवाहतूक पोलीस