Join us  

मत्स्य खाद्याचा समावेश अत्यावश्यक सेवेत करा, मासळीचे टेम्पो अडवू नका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2020 12:44 PM

मुंबईत मासे, आणि मत्स्य खाद्याच्या वाहतुकीवर निर्बंध लावल्यास मच्छिमार,मासे विक्री करणाऱ्या कोळी महिलांना मोठा आर्थिक फटका बसेल.

 - मनोहर कुंभेजकरमुंबई  - केंद्र सरकारच्या मत्स्यपालन विभागाने मासे, मत्स्य बीज आणि मत्स्य खाद्याचा समावेश अत्यावश्यक सेवेत केला आहे. महत्त्वाचे म्हणजे या गोष्टींची वाहतूक सुरळीतपणे सुरू करण्याचे आदेश बुधवारी परिपत्रकाव्दारे केंद्र सरकारने राज्य सरकारला दिले. मात्र मुंबईत लाॅकडाऊनच्या  पाश्र्वभूमीवर मुंबई पोलिस मासळी घेऊन जाणारे टेम्पो अडवत असल्याच्या अनेक तक्रारी आपल्याकडे आल्या असल्यानें पालिकेच्या विधी समिती अध्यक्षा शीतल म्हात्रे यांनी राज्याचे पर्यटन व उपनगराचे पालक मंत्री आदित्य ठाकरे यांच्याशी चर्चा केली.मासळी घेऊन जाणाऱ्या टेम्पोना परवानगी द्यायला काहीच हरकत नाही.आपण शासनाचे प्रधान सचिव भूषण गगराणी यांच्याशी बोला असे आदित्य ठाकरे यांनी सांगितल्याची माहिती शीतल म्हात्रे यांनी लोकमतला दिली.आपण याबाबत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याशी देखिल चर्चा केल्याची माहिती त्यांनी दिली.

मुंबईत मासे, आणि मत्स्य खाद्याच्या वाहतुकीवर निर्बंध लावल्यास मच्छिमार,मासे विक्री करणाऱ्या कोळी महिलांना मोठा आर्थिक फटका बसेल. त्यामुळे  अत्यावश्यक सेवेत याचा समावेश करावा अशीविनंती आपण आदित्य ठाकरे यांच्याकडे केल्याची माहिती त्यांनी दिली.

आपण त्वरीत भूषण गगराणी यांच्याशी संपर्क साधला असता,आपण मासळी घेऊन जाणारे टेम्पो अडवू नका अश्या सूचना मुंबई पोलिसांना देत आहे.तसेच कोळी महिला सोशल डिस्टनसिंग पाळून आणि योग्य ती खबरदारी घेऊन मासळी बाजारात मासळी विक्री करू शकतात असे गगराणी यांनी सांगितल्याची माहिती शीतल म्हात्रे यांनी दिली.

मुंबईत पालिकेचे ६२ आणि खाजगी ५० असे सुमारे११२ मासळी बाजार आहेत.तर पालिकेच्या रेकॉर्ड प्रमाणे मुंबईत ३३६५ कोळी महिला तर सुमारे २५०० इतर कोळी महिला मासे विक्री करतात.ससून डॉक व भाऊचा धक्का येथे होलसेल मासळी विक्री होते.एकूण मुंबईत रोज सुमारे 7 ते 8 कोटींची मासळी विक्री होते अशी आकडेवारी कोळी महासंघाचे सरचिटणीस राजहंस टपके यांनी लोकमतला दिली.

टॅग्स :मच्छीमारमुंबईमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस