Join us
Daily Top 2Weekly Top 5

चैत्यभूमी येथील अखंड भीमज्योतीचे लोकार्पण; ब्राँझमध्ये प्रतिकृती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2019 00:20 IST

साडेआठ फूट उंच

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक चैत्यभूमी येथील अशोकस्तंभाजवळ उभारण्यात आलेल्या अखंड भीमज्योतीचे बुधवारी उद्घाटन करण्यात आले. ही भीमज्योत सुमारे साडेआठ फूट उंच असून साडेसात फूट रुंद आहे. ब्राँझमध्ये बनविलेल्या या प्रतिकृतीमध्ये मेणबत्तीच्या आकारात ही ज्योत साकारण्यात आली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भीमज्योत उभारण्याची मागणी केली होती. त्यानंतर राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभाग आणि मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांमध्ये याबाबत बैठक होऊन भीमज्योत उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. पालिकेच्या वास्तुविशारदांनी भीमज्योतीचा आराखडा तयार केल्यानंतर त्यानुसार निविदा मागवून भीमज्योत उभारण्यात आली. यासाठी महापालिकेला सुमारे २२ लाख रुपयांचा खर्च आला आहे. तर, चैत्यभूमी परिसराच्या सुशोभीकरण आणि अन्य बाबींसाठी ४२ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

तथागत भगवान गौतम बुद्धांचा ‘अत्त दीप भव’ हा संदेश देणाºया या अखंड भीमज्योतीच्या उद्घाटनप्रसंगी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, सामाजिक न्याय मंत्री डॉ. सुरेश खाडे, राज्यमंत्री अविनाश महातेकर, खासदार राहुल शेवाळे, आमदार सदा सरवणकर, कालिदास कोळंबकर, भाई गिरकर, मागासवर्गीय महामंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ सरोदे, आरपीआयचे नेते दीपक निकाळजे, भदंत डॉ. राहुल बोधी महाथेरो, मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त जराड, साहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांच्यासह अनेक आजी-माजी नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते.