Join us  

सर्व कर्मचारी महिला असलेल्या टपाल कार्यालयाचे आज लोकार्पण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2020 6:47 AM

महिला सक्षमीकरणाचा संदेश देण्यासाठी टपाल खात्याने माहीम बाजार येथे सर्व महिला कर्मचारी व अधिकारी असलेले टपाल कार्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई : महिला सक्षमीकरणाचा संदेश देण्यासाठी टपाल खात्याने माहीम बाजार येथे सर्व महिला कर्मचारी व अधिकारी असलेले टपाल कार्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवारी या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात येईल. या कार्यालयात पोस्टमन ते पोस्टमास्टर या सर्व पदांवर महिला कार्यरत असतील. मुंबईत अशी आणखी पाच कार्यालये सुरू करण्यात येणार आहेत.या टपाल कार्यालयाचे उद्घाटन टपाल विभागाच्या सदस्य (परिचालन) अरुंधती घोष यांच्या हस्ते होईल. यावेळी महाराष्ट्र आणि गोवा परिमंडळाचे मुख्य पोस्टमास्टर जनरल एच. सी. अग्रवाल, मुंबई विभागाच्या पोस्टमास्टर जनरल स्वाती पांडे आणि मुंबई विभागाच्या टपाल सेवा संचालक कैया अरोरा उपस्थित राहतील. येथे नियमितपणे येणाऱ्यांमध्ये महिलांचे प्रमाण मोठे आहे. सुमारे ७० टक्के महिला येथे येतात. जेव्हा महिला आपापसात संवाद साधतात, तेव्हा कामात सहजता येते, हा विचार करून माहीम बाजार टपाल कार्यालयात महिला कर्मचाऱ्यांना तैनात करण्यातआले आहे. पोस्टमास्टरपासून पोस्टमनपर्यंत सर्व पदांवर महिला कर्मचारी नियुक्त असून बचत बँक काऊंटर, बहुउद्देशीय नोंदणी, आरक्षण काऊंटर, आधार केंद्र, इंडिया पोस्ट पेमेंट बँक यासारखी सर्व कामे त्या पाहतील. महिला सक्षमीकरणाच्या युगात महिलांच्या कार्यक्षमतेवर विश्वास ठेवून त्यांना संधी देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात येत असल्याची माहिती मुंबई विभागाच्या पोस्ट मास्टर जनरल स्वाती पांडे यांनी दिली.महिला कोणतेही कार्य करण्यास सक्षम असल्याचा संदेश यामधून नव्याने मिळैल. माहीम बाजार कार्यालयात ७ महिला कर्मचारी, अधिकारी कार्यरत राहतील, अशी माहिती त्यांनी दिली.दक्षिण मुंबईत टाऊन हॉल येथे १२ एप्रिल २०१३ पासून सर्व कर्मचारी महिला असलेले टपाल कार्यालय कार्यरत आहे. मुंबईत आणखी पाच ठिकाणी अशा प्रकारे सर्व महिला कर्मचारी असलेली टपाल कार्यालये सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई विभागाचे सहाय्यक संचालक विनायक नायक यांनी दिली. वडाळा, अंधेरी येथील हनुमान रोड, गिरगाव येथील आंबेवाडी, पवई हाऊसिंग कॉलनी, दौलत नगर अशा आणखी पाच ठिकाणी ही कार्यालये सुरू करण्यात येणार आहेत, अशी माहिती नायक यांनी दिली.

टॅग्स :पोस्ट ऑफिसमुंबई